वैजापूर तालुक्याचा 345 कोटी रुपयांचा जलजीवन योजनेचा आराखडा तयार

प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांकडे पाठविला

योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा-आ. बोरणारे

वैजापूर,१० डिसेंबर /प्रतिनिधी :- शासनाच्यावतीने तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना,मिशन जलजीवन व मातोश्री शेत-पाणंद रस्ते आदी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करून उद्दिष्ट पूर्ण करावे असे प्रतिपादन आ.रमेश पाटील बोरणारे यांनी गुरुवारी (ता.9) येथे महाआवास अभियान, मातोश्री शेत-पाणंद रस्ते योजना याबाबत आयोजित कार्यशाळेत बोलताना केले.

पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, पंचायत समितीच्या सभापती सिनाताई मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, तहसीदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे, जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत, रामहरीबापू जाधव, पंकज ठोंबरे, कृषी उपअधीक्षक श्री.देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदूरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी के.टी. जाधव,पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, सुनील कदम, राजेंद्र पाटील चव्हाण, कल्याण पाटील जगताप, अमोल बोरणारे यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक व अधिकारी उपस्थित होते.

आ.बोरणारे यांनी तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, मिशन जलजीवन व मातोश्री शेत-पाणंद रस्ते या योजनांचा आढावा घेऊन सरपंच, ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास या योजनेअंतर्गत एकूण 9 हजार 497 घरकुल मंजूर असून त्यापैकी 5 हजार 760 घरे पूर्ण झाली आहेत 3 हजार 737 घरकुल अपूर्ण आहेत.लाभार्थ्यांशी समन्वय साधून अपूर्ण असलेली घरे पूर्ण करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी प्रयत्न करावे असे आ.बोरणारे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले.

जलजीवन योजनेचा आराखडा तयार करतांना सरपंचांनी काळजी घ्यावी, वाड्या-वस्तीसाठी स्वतंत्र टाकीची सोय करावी असे सांगून मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना संपूर्ण मराठवाड्यात राबविण्यात येत असून संबंधित विभागाने वैजापूर तालुक्याचा 345 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांकडे पाठविला आहे असे बोरणारे म्हणाले. सरपंचांनी गांवातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे कोविड-19 लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही आ.बोरणारे यांनी यावेळी केले. या कार्यशाळा व आढावा बैठकीस तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक व अधिकारी मोठयासंख्येने उपस्थित होते.