दिमाखदार सोहळ्यात वेरूळ- अजिंठा महोत्सवास सुरुवात
कथ्थक, भरतनाट्यम, आणि लावणीने रसिक मंत्रमुग्ध

औरंगाबाद,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समिती, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तालबद्ध पदन्यास आणि शास्त्रीय सुरावटीत महोत्सवाला शनिवारी सायंकाळी दिमाखात सुरुवात झाली. सुवर्णझळाळी लाभलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील सोनेरी महालाच्या प्रांगणात महोत्सवाचा पहिला दिवस गाजला. शास्त्रीय नृत्य व लोकनृत्याचे लक्षवेधी सादरीकरण एकत्रित पाहण्याची संधी रसिकांना मिळाली.

‘त्रिपर्णी’तून मयूर वैद्य आणि मृण्मयी देशपांडे यांचे कथक, प्रार्थना बेहरे यांचे भरतनाट्यम आणि भार्गवी चिरमुले यांच्या लावणीने रसिकांना खिळवून ठेवले. नृत्यशैली भिन्न असली तरी त्यांचा शास्त्रीय पाया एक असल्याचे कलाकारांनी नृत्याविष्कारातून दाखविले.

शेवटी मयूर वैद्य मृण्मयी देशपांडे यांचे कथा प्रार्थना बेहेरे हिचे भरत नाट्यम आणि भार्गवी चिरमुले तिची लावणी असे एकत्रित त्रिपुरणीत सादर झालेला कला कलाविष्कार रसिकाची दाद मिळवून गेला.

दुसऱ्या सत्रात पं. राशीद खान यांचे शास्त्रीय गायन रंगले. आवाजातील हुकूमतीने खान यांनी मैफल गाजविली.

त्यानंतर गायक महेश काळे यांच्या गायनाने मैफलीत अधिक रंग भरले. नाट्यसंगीत, भक्तिसंगीत आणि शास्त्रीय गायनातून काळे यांनी रसिकांची दाद मिळवली. विजय घाटे आणि पं. राकेश चौरसिया यांच्या तबला व बासरीच्या जुगलबंदीने पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी आयोजित केलेल्या लेझर शो ने रसिकांच्या डोळ्यांचे पारडे फेडले.

 


दरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, प्रादेशिक पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, अशोक शिंदे, हरप्रितसिंग नीर, विजय जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी केले.