जालना येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीसाठी जागेची निश्चिती करुन तातडीने प्रस्ताव सादर करा-अमित देशमुख

जालना, दि. 14 :- जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ही शासनाची संकल्पना आहे.  त्यानुसार जालना येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीसाठी जागेची निश्चिती करुन तातडीने प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी श्री सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, प्रभारी सहाय्यक आयुक्त (औषध) अंजली मिटकर, डॉ. संतोष कडले, डॉ. एम.एस. बेग, डॉ. भारत सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री श्री. देशमुख म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याची शासनाची संकल्पना आहे.  जालना जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याची लोकप्रतिनिधींची मागणी असल्याने या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली जागा निश्चित करण्यात यावी.  जागा निश्चित करताना शहराला लागून तसेच ज्या ठिकाणी शहर विस्तारीकरणाची शक्यता आहे असे ठिकाण निवडण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कोविड-19 च्या अनुषंगाने आढावा घेताना मंत्री श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यात येत असून याबाबत समाधान व्यक्त करत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यावर अधिक भर देण्यात यावा.  डब्ल्यूएचओ व आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात ऑक्सिजन सुविधा असलेले बेड तसेच आयसीयू बेड उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन लाईन उपलब्ध नसेल अशा ठिकाणी रुग्णांना पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होईल, याची काळजी घ्यावी.  रुग्णालयांना रास्त भावाने ऑक्सिजन मिळेल याकडे लक्ष देण्याबरोबरच चांगल्या दर्जाचे मास्क, सॅनिटायजर नागरिकांना उपलब्ध होतील. तसेच मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध राहील यादृष्टीने दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

राज्यामध्ये कोविड बाधितांची संख्या कमी होऊन बरे होऊन जाणाऱ्यांची संख्या वाढत असून ही समाधानाची बाब आहे.  परंतु कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी  सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायजरचा वापर,वैयक्तिक स्वच्छता तसेच सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसताच तातडीने तपासणी करुन घेण्याबाबत जनमानसामध्ये अधिक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत असून जालना जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या, उपलब्ध बेड, रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा, कोविड सेंटर्स, ऑक्सिजन पुरवठा, औषधीसाठा, टेलिआयसीयू आदी बाबत माहिती देत माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 99 टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यापूर्वीही अशाच पद्धतीने दोन वेळेस सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती दिली.

कोविड-19 मध्ये रुग्णांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉ. संजय जगताप, डॉ. संतोष कडले, डॉ. दीपक लोणे, डॉ. आशिष राठोड,डॉ. उमेश जाधव यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवही करण्यात आला.

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नियोजित जागेची पाहणी

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीपूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जालना-अंबड रोडवरील कुंबेफळ शिवार येथे असलेल्या सहकारी सूतगिरणीशेजारी नियोजित शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या जागेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत प्रस्ताव तातडीने शासनाला पाठविण्याचे निर्देश यावेळी दिले.