महासत्ता होण्यासाठी भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे आवश्यक : जयंत सहस्त्रबुद्धे

औरंगाबाद,२२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- येथील विवेकानंद महाविद्यालयात विज्ञान प्रसार महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. दि. 22 ते 28 फेब्रुवारी या सात दिवस चालणाऱ्या विज्ञान जागराचे उद्घाटन विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री जयंत सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. 

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून भारतीय सूक्ष्मजीव संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर होते. या कार्यक्रमासाठी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अक्षय शिसोदे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री प्रभाकर मोरे, प्राचार्य डॉ. आर. एस. वनारे, संगणक विभागाचे संचालक डॉ. ए. टी. गायकवाड , उपप्राचार्य डॉ. डी. आर शेंगुळे,  डॉ.आर. बी. शेजुळ आणि या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नितीन अधापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Displaying WhatsApp Image 2022-02-22 at 4.57.39 PM (1).jpeg

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. वनारे यांनी महाविद्यालयात नियमितपणे चालणाऱ्या विविध उपक्रम यांचा परिचय करून दिला. 

जयंत सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या वक्तव्यात विज्ञान प्रसार महोत्सव आयोजनाची संकल्पना व महत्त्व स्पष्ट केले. भारतातील आजवरच्या गौरवशाली वैज्ञानिक परंपराची माहिती करून घेतल्यास आणि नजीक भविष्यात महासत्ता होण्यासाठीची आवश्यक असणारी वाटचाल समजून घेतल्यास भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे शक्य होईल असे ते म्हणाले.  यावेळी भारतीय वैज्ञानिकतेचा भक्कम पाया उलगडून दाखवण्यासाठी त्यांनी इतिहासातील अनेक दाखले व उदाहरणे दिली.

  उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अरविंद देशमुख म्हणाले की,  भारतात विज्ञान व बौद्धिकतेचा मोठा वारसा असतानाही आपल्याला पाश्चात्य शिक्षणाचे आकर्षण वाटते. भारतात मोठ्या प्रमाणावर ‘ब्रेन’ उपलब्ध आहे, मात्र त्याचे ‘ड्रेन’ होणे ही तितकीच दुःखद गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. विज्ञानाचे अत्यंत व्यापक असणारे आकाश समजून घेतल्यास देशाची प्रगती होऊ शकते असेही ते म्हणाले.  कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष श्री अक्षय शिसोदे म्हणाले की, आपल्या देशातील युवा ही आपले शक्तिस्थाने आहेत. त्यांनी विज्ञानवादी चिकित्सक व संशोधक दृष्टी बाळगली तर या विज्ञान महोत्सवाचे आयोजन साध्य झाल्यागत होईल.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भित्तीपत्रक स्पर्धेत १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच यावेळी अरोमा व सी व्ही रमण या दोन विज्ञान चित्रपटांचे सादरीकरण करण्यात आले. अरोमा या चित्रपटात भारतात घेतल्या जाणाऱ्या फुलांमधील सुगंधाची शेती किंवा व्यवसायाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे तर दुसऱ्या चित्रपटात विज्ञानाकडे पाहण्याचा रमण यांच्या दृष्टिकोनावर प्रकाशझोत टाकत हा वारसा येणाऱ्या प्रत्येक पिढीने चालू ठेवायला हवा असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शर्मिष्ठा ठाकूर यांनी केले. कार्यक्रमासाठी शहरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.