लाच स्वीकारणाऱ्या जमादाराला पोलीस कोठडी

औरंगाबाद,२ जून /प्रतिनिधी:-अ‍ॅटोपार्ट कंपनीतील कामगाराच्या खिशात सापडलेल्या गांजाची तक्रार दिल्यावरुन मजूर ठेकेदाराला बोलावून धमकी देत दीड लाखांच्या लाचेची मागणी करुन 60 हजार रुपये स्विकारणाऱ्या  जमादाराला चार जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.जे. रामगडीया यांनी बुधवारी दि.२ जून रोजी दिले. गणेश ज्ञानेश्वर अंतरप (४४असे लाचखोर जमादाराचे नाव आहे

फिर्यादीचा एमआयडीसी वाळुजमध्ये येथील कंपन्‍यांमध्‍ये कामगार पुरवण्‍याचा व्‍यवसाय आहे. एमाआयडीसी वाळूज येथील एका अ‍ॅटोपार्ट बनविणारी कंपनीत फिर्यादीचे १४० कामगार लेबर म्हणून काम करतात. २८ मे रोजी कंपनीत नव्याने रुजू झालेल्या एका कामगाराच्या खिशात आठवडाभरापुर्वी तंबाखूच्या पुडीत गांजा आढळल्याची तक्रार कंपनीने एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात केली होती. कंपनीच्या या तक्रारी अर्जाची चौकशी उपनिरीक्षक व जमादार अंतरपकडे वरिष्ठांकडून देण्यात आली होती. 30 मे रोजी अंतरपने कामगाराच्या कंत्राटदाराला फोन करुन ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी ठेकेदाराला तुझ्यावर गांजा पुरवल्याचा गंभीर आरोप असल्याचे सांगून कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, ठेकेदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंक विभागाने सापळा रचून 60 हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी आरोपीकडून गुन्‍ह्याचया अनुषंगारने इतर कागदपत्र हस्‍तगत करणे आहे. गुन्‍ह्यातील आरोपी आणि फिर्यादीच्‍या मोबाइलचा सीडीआर हस्‍तगत करणे आहे. तसेच घटनास्‍थळीचे सीसीटिव्‍ही फुटेज तपासणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.