वाईन शॉप मालकाला २५ हजारांची खंडणी,महाराष्‍ट्र समाज सेवा पार्टीचा संस्‍थाचालक अटकेत

औरंगाबाद,१३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वाईन शॉप बाबत राज्य उत्‍पादन शुल्क विभागाकडे खोट्या तक्रार देईल, उपोषणाला बसेल  अशी धमकी देत वाईन शॉप मालकाला २५ हजारांची खंडणी मागून दहा हजार रुपये स्‍वीकारणारा आरोपी महाराष्‍ट्र समाज सेवा पार्टीचा संस्‍थाचालक तथा अध्‍यक्ष दिलीप रामदास चाबुकस्‍वार (४८, रा. ब्रिजवाडी) याला मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी दि.१२ रात्री अटक केली. त्‍याला सोमवारपर्यंत दि.१४ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी रविवारी दि.१३ दिले.

प्रकरणात गजानन वाईन मार्टचा मॅनेजर गोविंद राधेशाम जैस्‍वाल (३४, रा. गोकुळनगर, जाधववाडी) याने फिर्याद दिली.आरोपी दिलीप चाबुकस्‍वार याने वाईन शॉप विरोधात खोट्या तक्रारी देत आणि वाईन शॉपवर येवून २५ हजार रुपये द्या राज्य उत्‍पादन शुल्क विभागाकडे खोट्या तक्रारी देत राहिल किंवा उपोषणाला बसेल अशी धमकी देत होता. तेंव्‍हा आरोपी आणि मॅनेजरमध्‍ये संवाद होऊन १८ हजार देण्‍याचे ठरले. १० फेब्रुवारी रोजी आरोपीला १० हजार रुपये दिले. त्‍यानंतर लेटर पॅडवर राज्य उत्‍पादन शुल्क विभगाला तक्रारी गैरसमजुतीने दिल्याचे कळवले आहे, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. व फिर्यादीकडे खंडणीतील उर्वरित आठ हजार रुपये देण्‍यासाठी तगादा लावला. फिर्यादीने याबाबत १२ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली. पोलिसांनी सापळा रचून आरोपी दिलीप चाबुकस्‍वार याला आठ हजारांची खंडणी घेतांना पकडले. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील ए.व्‍ही. घुगे यांनी आरोपीने फिर्यादीकडून यापूर्वी वसुल केलेली खंडणीची रक्कम हस्‍तगत करायची आहे. गुन्‍हा करण्‍यामागे आरोपीचा उद्देश काय होता. खंडणीची रक्कमेची विल्हेवाट आरोपीने कशी लावली तसेच आरोपीने अशा प्रकारे आणखी गुन्‍हे केले आहेत काय याचा तपास बाकी आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.