मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ सावत्र बाप व आईने केली आपल्या दोन अल्पवयीन मुलींची विक्री

वैजापूर ,५ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- आपल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ सावत्र बाप व आईने आपल्याच दोन अल्पवयीन मुलींची दलालांमार्फत परराज्यात 1 लाख 60 हजारात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आई – वडील व दलालांविरुद्ध वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मोंढा मार्केट परिसरातील अल्पवयीन मुलीवर आईच्या सहमतीने तिचा सावत्र बाप  व शेजारी राहणारा त्याचा मित्र लैंगिक अत्याचार करीत असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान पीडित मुलीच्या सावत्र बाप व आईने आपल्याच अन्य दोन अल्पवयीन मुलींचा दलालांमार्फत पैसे घेऊन गुजरात राज्यातील तरुणांशी विवाह लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आई-वडिलांनी आपल्या पंधरा व सोळा वर्षीय मुलींना आपल्याला नातेवाईकांकडे नाशिक जिल्ह्यातील मालेगांव येथे जायचे असल्याचे सांगून त्यांना फरजाना (रा. लासुर स्टेशन) या दलाल महिलेसह मालेगावला घेऊन आले.तेथे वहाब चाचा नावाच्या व्यक्तीची भेट घेतली.आई-वडील व मुलींनी चार-पाच दिवस मालेगाव येथे मुक्काम केला.तुम्ही दोघींचे गुजरातमधील व्यक्तींशी लग्न जमले असल्याचे आई-वडिलांनी मुलींना सांगितले. ते ऐकून मुलींना धक्का बसला.त्यानंतर मुलींना घेऊन ते सर्वजण गुजरात मधील जामनगरला गेले.तेथे गेल्यानंतर 8 व 10 जून 21 रोजी अनय नरेंद्र पाडलिया व भावीन रमेश विसावाडीया या दोघांशी त्या मुलींचे लग्न लावून दिले.

सासरी गेल्यानंतर काही दिवसांनी त्या मुलींनी आम्ही अल्पवयीन आहोत,आमचे लग्नाचे वय झालेले नाही असे सासरवाडीकडील मंडळींना सांगितले.मुली अल्पवयीन असल्यामुळे त्या लोकांनी दोन महिन्यानंतर मुलींना त्यांच्या गावी वैजापूरला आणून सोडून दिले. घरी आल्यानंतर त्या मुलींनी आपल्या मामा व मावशीला घडलेला प्रकार सांगितला.मुलींच्या विवाहापोटी आई वडिलांनी समोरच्या व्यक्तीकडून प्रत्येकी 80 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1 लाख 60 हजार रुपये घेतल्याची माहिती समोर आली.याप्रकरणी वैजापूर पोलिसात मुलींचे आई -वडील व दलालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.