क्रांती चौक ते गोपाल टी मार्गाचा लवकरच कायापालट होणार

स्ट्रीटस् फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटीचा प्रकल्प

औरंगाबाद शहरात लवकरच येणार एनएमटी पॉलिसी

औरंगाबाद,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद शहरातील मुख्य मार्ग असणाऱ्या क्रांती चौक ते गोपाल टी या मार्गाचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे या रस्त्याचे सुशोभीकरण आणि पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. लवकरच हा मार्ग नव्या रुपात नागरिकांच्या सेवेत असेल.

स्मार्ट सिटी मिशनच्या स्ट्रीट्स फॉर पीपल अंतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटी ने क्रांती चौक ते गोपाल टी, पैठण गेट ते गुलमंडी, कॅनॉट परिसर आणि एमजीएम – प्रियदर्शनी गार्डन हे चार रस्ते कायापालट करण्यासाठी घेतले आहेत. या मार्गांवर लोकांना सोयीस्कर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच त्यांचे सौंदर्यीकरण देखील करण्यात येणार आहे. यातील क्रांती चौक ते गोपाल टी या मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर आणि स्नेहा बक्षी, प्रकल्प सहयोगी किरण आढे यांच्याबरोबर ITDP (Institute for Transportation and Development Policy) चे अधिकारी प्रांजल कुलकर्णी आणि सिद्धार्थ गोडबोले यांनी आज या मार्गाची पाहणी केली. या मार्गासाठी काही डिझाईन मागवण्यात आले होते. आयटीडीपी या केंद्र शासनासोबत काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे या मार्गाचे डिझाईन निश्चित करण्यात आले आहे. या डिझाईनचे सादरीकरण आ. संजय शिरसाठ यांना देण्यात आले होते. त्यांनी सुचवलेल्या कल्पना आणि सूचना लक्षात घेऊन या डिझाईन मध्ये बदल करण्यात आले आहेत.

या प्रकल्पाद्वारे या मार्गाचा कायापालट करण्यात येईल. या मध्ये पादचाऱ्यांसाठी फूटपाथ तयार करण्यात येणार आहे. याबरोबरच वृक्षारोपण, पार्किंग व्यवस्था, आसनव्यवस्था करण्यात येणार आहे. त्याबरोबरच नागरिकांच्या सुविधेसाठी मार्गदर्शक फलक देखील लावण्यात येणार आहेत. हा मार्ग नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर या मार्गाचे सौंदर्यीकरण देखील करण्यात येणार आहे. याचे काम झाल्यानंतर नागरिकांना फिरण्यासाठी एक नवी जागा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉप 26 या ग्लासगो येथील परिषदेत स्वच्छ वायू आणि स्वच्छ वातावरण बनवण्याविषयी दिलेल्या आश्वासनाला अग्रभागी ठेवून हे डिझाईन तयार करण्यात आले आहे. नेट झिरो टारगेट साध्य करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांच्या अलीकडील औरंगाबाद दौऱ्यावेळी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचा दृष्टीने पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित केले होते.

मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे प्रयत्न सुरू

औरंगाबाद मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे शहरात एमएमटी पॉलिसी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच शहरात ही पॉलिसी राबवण्यात येईल. यामुळे पादचारी आणि सायकलस्वारांना मोठा दिलासा मिळेल.

मनपा आयुक्त व प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी चे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा मार्गदर्शनाखाली पार्किंग पॉलिसी व हॉकर्स झोन पॉलिसी च्या नंतर आता नॉन मोटराईस्ड ट्रान्सपोर्ट पॉलिसी वर कार्य सुरू झाला आहे.
आज स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्यालयात स्मार्ट सिटी टीम आणि आयटीडीपी ( Institute for Transportation and Development Policy) यांची बैठक झाली. या बैठकीत ITDP चे अधिकारी प्रांजल कुलकर्णी आणि सिद्धार्थ गोडबोले यांनी एनएमटी (Non Motorized Transport Policy) पॉलिसीची माहिती दिली. यावेळी स्मार्ट सिटी औरंगाबादचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, स्नेहा बक्षी, प्रकल्प सहयोगी किरण आढे उपस्थित होते. यावेळी आयटीडीपी या आंतररष्ट्रीय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या पॉलिसीची माहिती दिली. या पॉलिसी द्वारे फूटपाथ, सायकल ट्रॅक, ग्रीनवे आणि इतर एनएमटी सुविधांचे सुरक्षित आणि आनंददायी जाळे निर्माण करून शहरातील चालणे सोईस्कर आणि सायकलिंगमध्ये वाढ शक्य होईल. नुकताच औरंगाबादने राष्ट्रपातळी वर 113 शहरांमध्ये स्ट्रीटस् फॉर पीपल चॅलेंज मध्ये विजय मिळवला आहे, ही पॉलिसी राबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या रेस टू झिरो आणि रेस टू रेसिल्यन्स मध्ये औरंगाबाद द्वारे हे एक योगदान ठरेल. या पॉलिसीद्वारे शहराला स्वच्छ वातावरण आणि निरोगी व सुदृढ आरोग्य देण्यास मदत होईल. जगभरातील विविध शहरांमध्ये अशा प्रकारची पॉलिसी अंमलात आणली जात आहे. याच अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गद्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी द्वारे ही पॉलिसी राबवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या पॉलिसीचा मसुदा तयार करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अरुण शिंदे व मनपा उपायुक्त अपर्णा थेटे ह्यांचा देखरेखीखाली ही प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे.