दोन मोटारसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू एक जखमी

खुलताबाद ,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ सोलापूर -धुळेवरील पळसवाडी गावाजवळ दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. 
हा अपघात  शनिवारी राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ५२ औरगाबाद ते धुळे  या महामार्गावर पळसवाडी येथील रोहिणी हॉटेलजवळ सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला.  
एम एच १९ डी पी ६७१६ ही  मोटरसायकल धुळे कडुन औरंगाबादकडे भरधाव वेगात जात असताना मोटारसायकल वरील ताबा सुटल्याने व समोरील मोटारसायकल क्रमांक एम एच २० डी डब्लू ६३५६ ला जोराची धडक देऊन  रोडच्या दुभाजकला धडकुन हा  अपघात झाला आहे. या अपघातात भरत ईश्वर पाटील वय ३७ वर्ष यांचा मृत्यू झाला तर शुभम हनुमंत पाटील वय ३५ वर्ष  हे जखमी झाले. दोघेही  वडोदा ता.चोपडा जि जळगाव येथील राहणारे आहेत. जखमी शुभम पाटील यांना मृत्युंजय दूत मसीउद्दीन शेख यांनी  खाजगी रुग्णवाहिकाने वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच  महामार्ग वाहतूक सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड यांच्यासह महामार्ग व खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्र  दाखल केले आहे. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत चालू केली. खुलताबाद पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.