अवैधरित्‍या चालणाऱ्या गॅस रिफिलींग अड्ड्यावर छापा,चौघा आरोपींना अटक

औरंगाबाद,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- अवैधरित्‍या चालणाऱ्या  गॅस रिफिलींग अड्ड्यावर छापा टाकुन सिटीचौक पोलिसांनी चौघां आरोपींना मंगळवारी दि.८ सकाळी अटक केली. त्‍यांच्‍याकडून दोन लाख ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे. ही कारवाई लोटा कारंजा परिसरात करण्‍यात आली.

मेहराज पाशा सय्यद (२३, रा. अन्‍सार कॉलनी), आमेर खन बाबा खान (२७, रा. खोकडपुरा), शेख नाजीम शेख नासिर (२२, रा. रेंगटीपुरा) आणि शेख ईफहाम शेख सामी (२०, रा. बाबर कॉलनी) अशी अटक आरोपींची नावे असून त्‍यांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी दिले.

लोटाकारंजा परिसरातील मर्कस रोडवरील जनता वाशिंग सेंटर येथे अवैधरित्‍या घरगुती गॅस ऑटो रिक्षात रिफिल करण्‍यात येत असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली. माहितीआधारे पोलिसांनी छापा मारुन घरगुती गॅस रिक्षात रिफिल करणाऱ्या चौघा आरोपींना अटक केली तर आरोपी जावेद हा पसार होण्‍यात यशस्‍वी झाला.

आरोपींकडून एक छोटा हत्ती वाहन (क्रं. एमएच-१२-जीटी-१३९४) एचपी कंपनीचे दोन भरलेले व दोन रिकामे सिलेंडर, भारत गॅस कंपनीचे तीन रिकामे व एक भरलेले सिलेंडर, इलेक्ट्रीक वजन काटा, पाईप व नोजल जोडलेली इलेक्ट्रीक मोटार असा सुमो दोन लाख ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्‍याचे उप‍ निरीक्षक रोहित कैलास गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी  यांनी आरोपींच्‍या पसार साथीदाराला अटक करायची आहे. आरोपींकडून जप्‍त करण्‍यात आलेला मुद्देमाल त्‍यांनी कोठुन व कोणाकडून आणला ? आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.