कृषी पंपाची थकीत वीज बील वसुलीसाठी होणारी शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा -आ.बोरणारे

वैजापूर ,५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- कृषी पंपाची थकीत  वीज बिल वसुलीसाठी शेतक-यांची अडवणूक  करण्याची भुमिका टाळण्याची सूचना आ. रमेश पाटील बोरणारे यांनी  महावितरण कंपनीतील अधिकारी  व  कर्मचा-यांच्या बैठकीत  दिली. महावितरण कंपनीकडून  ग्रामीण  भागात कृषी पंपाचे थकीत  वीज बिल वसुलीचे उदिष्ट गाठण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बंद  करण्याची  कारवाई  करण्यापुर्वी आमच्याशी  संपर्क साधा आम्ही त्या गावातील ग्राहकांना  थकबाकीची रक्कम जमा करण्यासाठी  सहकार्य करु अशा शब्दांत आ.बोरनारे यांनी  महावितरणच्या अधिका-यांना सुनावले.

महावितरण  कंपनीच्या उपविभाग एक व दोन कार्यालयाच्या यंत्रणेने ३९ हजार ५०८ कृषी पंपधारक ग्राहकांकडील कृषी धोरण २०२० नुसार एकूण  २७० कोटीचे थकीत वीज बिल वसुलीसाठी सर्वत्र धडक मोहीम हाती घेतली आहे. वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून गावस्तरावरील विद्युत पुरवठा करणारी रोहित्र बंद  करण्याची कारवाई  केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अंसतोषाचा भडाका उडाला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर यामुळे अपेक्षित उत्पादना पेक्षा नुकसानीचा तडाखा अधिक बसला आहे. त्यात महावितरण कंपनीकडून थकीत रक्कम भरल्या नंतरच वीज पुरवठा सुरळीत करण्याची भुमिकेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या प्रश्नावर शेतक-यांच्या तक्रारीचा ओघ प्राप्त झाल्यामुळे आ.रमेश बोरनारे यांनी या विषयावर महावितरण कंपनी कार्यालयाच्या आवारात अधिकारी, कर्मचारी आणि शेतक-यांची संयुक्त बैठक गुरुवारी घेतली. 

या बैठकीला माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, शेतकरी प्रतिनिधी सिताराम वैद्य, सुनील चव्हाण,  वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता राहूल बडवे, रविंद्र मोरे, सहाय्यक अभियंता विरांग सोनवणे, शहर अभियंता अविनाश जेंगठे, माजी पंचायत समिती सदस्य रामदास वाघ, गोरख आहेर, प्रकाश मतसागर, फकिरा पवार,  महेश बुनगे, शंकर मुळे यांची उपस्थिती होती. ग्रामीण  भागात पाऊसपाणी समाधानकारक  असल्यामुळे रब्बी  हंगामातील पीकांची  शेतक-यांनी  लागवड  केली  आहे. वीज पुरवठा तोडल्यामुळे  पिकांना पाणी कसे द्यायचे  संकट निर्माण झाले आहे.वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा तोडण्याची कारवाई चुकीची असल्याच्या  तक्रारीचा पाढा शेतक-यांनी बैठकीत वाचला. आ.बोरनारे यांनी महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांना वीज बिल वसुलीसाठी समन्वयाची भुमिका घ्या. गावपातळीवर वसुलीसाठी आम्हाला सोबत घ्यावे अशा सूचना त्यांनी महावितरण कंपनीतील अधिका-यांना दिल्या. वैजापूर तालुक्यात १६ हजार कृषी पंपधारक ग्राहकांनी ११ कोटी ७५ लाखाचा वीज बिलाची रक्कम अदा केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राहूल बडवे यांनी दिली.या बैठकीस महावितरणचे सहाय्यक अभियंता विरांग सोनवणे, रविंद्र मोरे, अनिल डुकरे, नितीन कुलकर्णी, योगेश वायखंडे, मोहम्मद अब्दुल हकीम, किशोर पवार यांची उपस्थिती होती. 
वसुली करता तशी प्रभावी सेवा ग्राहकांना द्या-माजी नगराध्यक्ष साबेर खान

ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर बंद करुन शेतक-यांकडून वीज बिल वसुल केले जात आहे .इतर वेळा ग्रामीण भागात विद्युत पुरवठा नादुरुस्त झाल्या नंतर तो सुरळीत करण्याच्या नावाने महावितरण कंपनीची आधीच बोंबाबोंब झाली आहे. त्यामुळे जशी कडक वसुली करता तशीच प्रभावी सेवा ग्राहकांना वेळेवर  पुरवावी अशी अपेक्षा पालिकेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केली.