पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – पानवी खंडाळा येथील ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

वैजापूर,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पानवी खंडाळा परिसरात पावसामुळे पिके आडवी पडली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पानवी खंडाळा येथील ग्रामस्थांनी तहसीलदार राहुल गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात पानवी खंडाळा येथील शेतकऱ्यांनी नमूद केले आहे की, गेली चार-पाच दिवस सलग झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतातील उभी असलेली मका, बाजरी, कपाशी,सोयाबीन, ऊस ही पिके आडवी पडली असून या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अमोल पाटील बावचे, ग्रामपंचायत सदस्य ताईबाई बावचे, मीराबाई बावचे, उज्वला बावचे, पोलीस पाटील वाल्मिक बावचे ,राधू बावचे आदींच्या सह्या आहेत.