प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

वैजापूर ,५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याच्या अवजड वाहतुकीमुळे वैजापूर ते म्हस्की हा ग्रामीण भागातील नऊ किमी लांबीचा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे. या रस्त्याची कंत्राटदाराने दुरुस्ती करावी या मागणीसाठी म्हस्की सिद्वापुरवाडी गट ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांनी शुक्रवारी समृद्धीच्या पुलावर आत्मदहन आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. मात्र तहसिल प्रशासन व पोलिसांनी हस्तक्षेप करुन नागरिकांची समजुत काढल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. 

तालुक्यातील म्हस्की ते वैजापूर  रस्त्यावरून समृध्दी साठी लागणारे मुरूम, म्हस्की येथील धरणातून तसेच सिद्धापूरवाडी येथून ही नेण्यात आले.समृध्दीच्या अवजड वाहनामुळे या रस्त्याचे अक्षर:शा बारा वाजले.परंतु समृध्दीचे कंत्राटदार असलेली कंपनी फक्त वैजापूर ते समृध्दी च्या पुलापर्यंतच हा रस्ता डांबरीकरण करत आहेत. समृध्दीच्या पुलापासून हा रस्ता तसाच राहीला आहे. त्यामुळे म्हस्की / सिद्धापूरवाडी ग्रूप ग्रामपंचायत तर्फे आत्मदहन आंदोलन करायला आंदोलनकर्ते समृध्दी पुलावर हजर झाले होते.

====================

म्हस्की वैजापूर रास्ता हा सिद्धापुरवाडी विरगाव,नादी,डागपिंपळगाव व कापुसवडगाव या गावांना मिळतो त्या गावांना वैजापूरला जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. या रस्त्यासाठी मागे हटणार नाही.
        -प्रभाकर बारसे, पं.स उपसभापती वैजापूर.


जवळपास दहा कोटींच्या किंमतीचे जिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते समृध्दीमुळे खराब झाले.जर म्हस्की रस्ता डांबरीकरण करून नाही दिला तर आम्ही म्हस्की रस्त्यावरील कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करु.
                पंकज ठोंबरे जि. प.सदस्य


समृध्दीच्या रस्त्यासाठी  मुरूम वाहतूक केल्यामुळेच रस्ता खराब झाला.आम्ही आज सर्व गावकरी आत्मदहन करायला समृध्दी पुलावर गेलो होतो.परंतु नायब तहसीलदार कुलकर्णी यानी आम्हाला रस्त्याचा अवहाल मागून रस्त्याचा लवकरच प्रश्न मार्गी लावू या मुळे आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन मागे घेतले.जर रस्ता नाही केला तर पुन्हा आम्ही जोरदार आंदोलन करू.
                गणेश सावंत. तंटामुक्त अध्यक्ष म्हस्की ता.वैजापूर

——————————————-

गोपनीय शाखेचे संजय घुगे यानी आंदोलनकर्ते यांना समजूत दिली व समृध्दीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी बोलवून घेतले. नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांनी आम्ही संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत अहवाल मागवु व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत व वीरगाव पोलीस ठाण्याचे एपीआय विजय नरवडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, पंचायत समितीचे माजी प्रभाकर बारसे, सरपंच नंदू हारदे, उपसरपंच अमोल तागड, तंटामुक्त अध्यक्ष गणेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य शफीक शेख, ताहेर शेख, नानासाहेब तागड, काशिनाथ सोमवंशी, विजय हारदे, सुरेश पवार, एकनाथ जाधव, खलील शेख, वाल्मीक सोमवंशी, सोनू सोमवंशी, समीर शेख, दिनकर गायके, शारीक सय्यद उपस्थित होते.