खून प्रकरणी एकास दुहेरी जन्मठेप ; वैजापूर कोर्टाचा निकाल

वैजापूर ,१८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- चोरी करण्यास विरोध करणाऱ्या वृद्धाचा चाकूने वार करुन खुन केल्याप्रकरणी वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास दुहेरी जन्मठेप, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी एक वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली.‌ शंकर उर्फ लखन नंदु जगताप (24) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम.ए. यांनी हा निकाल दिला.

26 सप्टेंबर 2018 रोजी वाळुज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मलकापूर शिवारातील गट क्रमांक 21 मध्ये झालेल्या या घटनेत आरोपीने दामुभाऊ किसन महारनोर (वय 63) यांचा बाजरीच्या पिकामध्ये चाकूने वार करुन खुन केला होता. तसेच दादासाहेब अण्णासाहेब महारनोर या बारा वर्षांच्या मुलासही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. घटनेच्या दिवशी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान आरोपी हा दामुभाऊ महारनोर यांच्या मालकीची बैलगाडी व एक गाय चोरुन नेत होता. त्यावेळी दामुभाऊ यांनी त्याची चोरी रोखण्याचा प्रयत्न केला. म्हणुन आरोपीने बाजरीच्या पीकात चाकुने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत दामुभाऊ यांचा मृत्यु झाला. तसेच आरोपीने दादासाहेब महारनोर या मुलासही जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी वाळुज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी सतीश कुमार टाक यांनी वैजापूर न्यायालयात गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. एक. यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी एकुण बारा जणांच्या साक्षी घेतल्या. यात फिर्यादीसह, डॉक्टर, तपासी अधिकारी आदींच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीस खुनप्रकरणी आजन्म कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद तसेच जबरी चोरीच्या आरोपाखाली आजन्म कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी सहा महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणात पोलिस निरीक्षक सचिन इंगोले व पैरवी अधिकारी गणेश कोरडे यांनी सहकार्य केले.