समृध्दी महामार्गालगत जांबरगाव – घायगाव येथे होणाऱ्या नवनगरांसाठी वाढीव क्षेत्राला मान्यता

आ.बोरणारे यांच्या प्रयत्नाला यश

वैजापूर,२५ डिसेंबर /प्रतिनिधी :- हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गांतर्गत वैजापूर तालुक्यात जांबरगाव व घायगाव परिसरात होणाऱ्या कृषि समृद्धी केंद्रांच्या (नवनगरे) क्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे घायगाव परिसरातील नवनगरामध्ये ३२७ हेक्टर ७९ आर एवढे क्षेत्र वाढणार आहे. 

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना विभागातर्फे वाढीव क्षेत्राचा फेरबदल अधिसुचित करण्यात आला असून या क्षेत्रासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नवनगराचे क्षेत्र वाढण्यावर शिक्कामोर्तब झाले असून या निर्णयाचे परिसरातील शेतकऱ्यांंनी स्वागत केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रादेशिक योजनेत समाविष्ट असलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या जांबरगाव व घायगाव येथील अंशत: क्षेत्र शेती व ना विकास विभागातुन वगळुन या ठिकाणी कृषि समृद्धी केंद्र अर्थात नवनगर विकसित करण्यात येणार आहे. या नवनगरात ३२७ हेक्टर ७९ आर. अतिरिक्त क्षेत्राचा समावेश करण्यासाठी वैजापुरचे आमदार रमेश बोरनारे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नगररचना विभागाने चौकशी केल्यानंतर हे अतिरिक्त क्षेत्र कृषि विभागातुन वगळुन नवनगर म्हणुन निर्देशित करण्यास मान्यता दिली. या बदलाबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.