केंद्र सरकारकडून औरंगाबाद माझी स्मार्ट बसला प्रथम पुरस्कार

हवामान स्मार्ट सिटी मुल्यांकना अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवडला 4 स्टार मानांकन

पीएमएवाय-शहरी अंतर्गत 1.12 कोटी घरांना मंजुरी आणि 83 लाख घरे निर्माणाधीन

औरंगाबाद,२५जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद स्मार्ट सिटी बसने अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डस (आयएसएसी) २०२० जिंकला आहे, अशी घोषणा भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने शुक्रवारी केली.

अवासन व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत अमृत, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि स्मार्ट सिटीज मिशनच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त अवासन व शहरी कामकाज विभागाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि स्मार्ट सिटीज मिशन संचालक कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आणि उर्वरित स्मार्ट सिटी टीम कार्यक्रमास विडिओ कॉन्फेरंसन्ग च्या द्वारे सहभागी झाले.

तत्कालीन युवा सेने नेते आणि विद्यमान मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी 2019 मध्ये माझी स्मार्ट बस प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते. 100 बसेस सोबत स्मार्ट बस प्रकल्प 32 मार्गांवर पोहोचतो. पूर्ण क्षमतेमध्ये स्मार्ट सिटी बसेस एकाच दिवसात तब्बल 22,000 किलोमीटर नेटवर्क व्यापतात. आतापर्यंत स्मार्ट बसने एकूण 52 लाख किलोमीटर धावताना 87 लाखाहून अधिक प्रवाश्यांना सेवेचा लाभ दिला आहे.
जास्तीत जास्त क्षमतेवर कार्यरत असताना स्मार्ट सिटी बसने एका दिवसात 15000 पर्यंत प्रवाश्याना सेवा दिली आणि सर्व बसेस कार्यरत असल्यास ही संख्या 25000 पर्यंत वाढेल.
कोविड -१९ साथीच्या आजारामुळे बससेवेला मोठा फटका बसला असला तरी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) आणि औरंगाबाद महानगरपालिकेने कोव्हीड रुग्णवाहिका म्हणून बसचा वापर केला. या कालावधीत, बसेसने आरोग्य कर्मचारी आणि कोविड रूग्णांची वाहतूक करून 4 लाख पेक्षा अधिक किलोमीटर व्यापले आहेत.

नोव्हेंबरमध्ये कोविड -१९ लॉकडाउननंतर नवीन डिजिटल अवतार मध्ये बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. ई-तिकिटिंग, प्रवाशांच्या सुविधेसाठी स्मार्ट कार्ड, बस ट्रॅकिंग मोबाइल अॅप अशा नवीन व आकर्षक योजना आणि सुविधांसह बससेवा सुरू करण्यात आली. शहरात १५० स्मार्ट बस थांबे आणि ४०० चिन्हांचे खांब बस सेवेला पूरक ठरणारे आहेत.

माझी स्मार्ट बस सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाश्यांसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या एका कार्डाद्वारे नागरिक वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक सेवा वापरू शकतात.

या पुरस्कार बद्दल बोलताना मनपा आयुक्त आणि प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी स्मार्ट सिटी टीम चे अभिनंदन केले आणि यशस्वीतेसाठी सर्व भागधारकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. “स्मार्ट बससाठी पुरस्काराचे श्रेय औरंगाबादमधील नागरिकांनाच आहे. त्यांनी बस सेवेचा लाभ घ्यावा व स्मार्ट बसच्या डिजीटल सुविधा व योजनांचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो,” श्री पांडेय म्हणाले.

माझी स्मार्ट बस प्रकल्प मनपाचे माजी आयुक्त आणि एएससीडीसीएलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी निपुण विनायक ह्यांचा प्रयत्नाने सुरु करण्यात आले होते. एएससीडीसीएलचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी, मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनीकर, डेप्युटी मॅनेजर सिद्धार्थ बनसोड, विश्लेषक विशाल खिल्लारे, प्रोजेक्ट असोसिएट रुशिकेश इंगळे, सहाय्यक मॅनेजर (लेखा व प्रशासन) माणिक निला, सहाय्यक व्यवस्थापक विलास काटकर, माजी उप-व्यवस्थापक (चालन आणि देखभाल) ललित ओस्तवाल, माजी उपव्यवस्थापक (ऑपरेशन्स) एमआर खिल्लारे यांनी पहिल्या दिवसापासून माझी स्मार्ट बस प्रकल्पात काम केले आहे.

पीएमएवाय-शहरी, अमृत आणि स्मार्ट सिटी अभियानाच्या 6 वर्षपुर्तीनिमित्त साजरा केला कार्यक्रम

नवी दिल्‍ली, 25 जून 2021


गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने, स्मार्ट सिटी अभियान(एससीएम), नागरी पुनरुज्जीवन आणि नागरी परिवर्तनासाठी अटल मिशन (अमृत ) आणि प्रधान मंत्री आवास योजना – शहरी   पीएमएवाय-यु, ज्याचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून  2015 ला केला होता अशा  परिवर्तनकारी या तीन नागरी  अभियानांच्या 6 वर्षानिमित्त आज ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला होता. स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत राबवण्यात येणारे काही महत्वाचे उपक्रम या वर्धापन दिन कार्यक्रमात ठळकपणे दर्शवण्यात आले. केंद्रीय  गृह निर्माण आणि नागरी व्यवहार राज्य मंत्री( स्वतंत्र कार्यभार )  हरदीप एस पुरी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रधान सचिव, महानगर पालिकांचे आयुक्त,स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रधान मंत्री आवास योजना – शहरी (पीएमएवाय)

लाखो भारतीयांचे पक्क्या घराचे स्वप्न  पूर्ण करणाऱ्या या अभियानाचा  सहा वर्षांचा झळाळता प्रवास उलगडणारा  लघुपट हरदीपसिंह  पुरी यांनी प्रकाशित केला.  पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वाना घर पुरवण्याच्या पूर्ततेच्या दृष्टीकोनातून पीएमएवाय-यु ने उत्तम कामगिरी नोंदवली आहे. पीएमएवाय-यु अंतर्गत 1.12 कोटी घरांना लाभार्थीसाठी मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 83 लाख घरे निर्माणाधीन असून 48 लाखाहून अधिक घरे पूर्ण झाली आहेत. पीएमएवाय-यु च्या अंमलबजावणी मध्ये सहकार्यात्मक संघीयवादाचे तत्व अमलात आणले असून  मंत्रालयाने प्रकल्प आखणी ,मुल्यांकन आणि मंजुरीचे अधिकार राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे सोपवले आहेत. या अभियानाच्या यशाचे श्रेय जोमदार वित्तीय मॉडेलला जात असून थेट लाभ हस्तांतरण हा यातला महत्वाचा घटक आहे. याशिवाय देखरेखीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, तंत्रज्ञान विषयक नवोन्मेश, अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधनाद्वारे अतिरिक्त निधी यांचाही यात वाटा आहे.  अभियाना अंतर्गत आतापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या घरांसाठी 7.35  लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असून  1.81 लाख कोटी रुपयांचे  केंद्रीय सहाय्य आहे.

इतर क्षेत्राशी संलग्न असल्यामुळे या क्षेत्रात सरकारकडून केलेल्या  सध्याच्या गुंतवणुकीमुळे  अंदाजे 689 कोटी मानव दिवस रोजगार निर्मिती ज्याचे रुपांतर 246 लाख रोजगारात होते आणि 370 लाख मेट्रिक टन सिमेंट आणि 84 लाख  मेट्रिक टन पोलाद उपयोगात आले.

डाटा परिपक्वता मुल्यांकन आराखडा 2.0

या महामारीत डाटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शहरांचा अनुभव आणि या संकटाला रोखण्यासाठी, आटोक्यात आणण्यासाठी आणि त्याची दखल घेण्यासाठी प्रभावी प्रतिसाद यंत्रणा उभारल्यामुळे,डाटाच्या सामर्थ्यावरचा त्यांचा विश्वास दृढ होऊन डाटा स्मार्ट होण्यासाठी त्यांना मदत झाली.

गेल्या काही महिन्यात सर्व 100 स्मार्ट सिटीनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि गेल्या दोन वर्षात  प्रगल्भता आणि प्रगतीही दर्शवली. एकूण 42 शहरांनी प्रमाणपत्र स्तर  प्राप्त केला त्यापैकी सुरत,पिंपरी चिंचवड, भोपाळ आणि पुणे या शहरांनी कनेक्टेड प्रमाणपत्र प्राप्त केले.

संकल्पनेला अनुसरून विजेते / संयुक्त विजेते

प्रशासन  विभागात वडोदरा  जीआयएसने प्रथम क्रमांक तर ठाण्याच्या डिजिटलने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

नागरी मोबिलिटी मध्ये औरंगाबादच्या माझी स्मार्ट बसने प्रथम क्रमांक पटकावला आहे.कोविड इनोव्हेशन पुरस्कारासाठी कल्याण-डोंबिवली आणि वाराणसी संयुक्त विजेते ठरले आहेत.