वैजापूर तालुक्यातील 102 सोसायट्या डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र ; बाजार समितीची निवडणूक लांबणीवर

जफर ए.खान

वैजापूर,२ डिसेंबर :- आधी सोसायटीच्या निवडणुका त्यानंतरच बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या आदेशानुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे डिसेंबर 2021अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या वैजापूर तालुक्यातील 102  सोसायट्यांच्या निवडणुका आधी घ्याव्या लागणार असून त्यांनंतरच बाजार समितीची निवडणूक होणार आहे. बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडल्याने निवडणुकीची तयारी करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला असून त्यांना मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुकानंतर  निवडणुकीस पात्र असलंलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्राधिकरणाकडून स्वतंत्र आदेश काढण्यात येतील.वैजापूर तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था – 102,  नागरी व ग्रामीण पतसंस्था – 34 व अभिनव, सुशिक्षित बेरोजगार व इतर – 52 अशा एकूण 188 संस्था 31 डिसेंबर अखेरीस निवडणुकीस पात्र आहेत.गांवातील विविध कार्यकारी सोसायट्यांचे संचालक बाजार समिती निवडणुकीत मतदार असतात.

कोरोनामुळे निवडणुका न झाल्याने अनेक सोसायट्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर काही सोसायट्यांची मुदत संपलेली आहे.सोसायटी मतदारसंघातून निवडून येणाऱ्या संचालकांची संख्या जास्त असते सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या नाही तर बाजार समित्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व राहत नाही.त्यामुळे बाजार समितींच्या निवडणुकीत अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणूका घेणे आवश्यक आहे. याकरिता तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यास पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिल महिना उजाडणार आहे