भाजपचे किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा – वैजापूर तालुका शिवसेनेची मागणी

वैजापूर,७ एप्रिल  /प्रतिनिधी :- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचविण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील लोकांकडून मोठ्याप्रमाणात निधी गोळा केला परंतु तो निधी त्यांनी राजभवनात जमा केला नाही.लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्या यांनी गद्दारी केली असून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वैजापूर तालुका शिवसेनेने गुरुवारी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

या संदर्भात वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, युवासेनेचे श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके, कमलेश आंबेकर, निखील वाणी, चंदन राजपूत, अक्षय राजपूत, जालीम मेहर, प्रभाकर मते, श्रीराम निकम, गुड्डू शेख आदींनी आज सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारने आयएनएस विक्रांत जहाज वाचविण्यासाठी असमर्थता दर्शविल्याने भाजपचे किरीट सोमय्या हे पुढे आले व त्यांनी 2013 मध्ये आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी मोहीम सुरू केली.या मोहीमेतून त्यांनी मोठ्याप्रमाणात निधी गोळा केला.आयएनएस विक्रांत हा जहाज देशाच्यादृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने लोकांनी सढळ हाताने मदत केली. हा निधी राजभवनात जमा करण्याचे  किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. परंतू त्यांनी निधी राजभवनात जमा केला नाही.असे आरटीआय मधून समोर आले आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्यांनी गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. तरी किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. असे निवेदनात नमूद केले आहे.