आक्रोशाची ठिणगी औरंगाबादमध्ये , वणवा दिल्लीत पोहोचणार-शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा इशारा

May be an image of 7 people, people standing and outdoors

औरंगाबाद,१३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- महागाईविरोधात शिवसेनेच्या या आक्रोशाची ठिणगी औरंगाबादेत  पडली आहे. या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. मराठवाड्याने  महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली आहे. हा इतिहास पाहता आम्ही मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेतून आम्ही या आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे. ही तर सुरुवात असून या ठिणगीचा वणवा थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल. या आक्रोशामुळे दिल्लीतील केंद्र सरकारचे तख्तही यामुळे हादरेल, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.

May be an image of 8 people, people standing, outdoors and crowd

शिवसेनेतर्फे औरंगाबादेत शनिवारी महागाईच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे आयोजन जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी केले होते. क्रांतीचौकातून निघालेल्या मोर्चाची सांगता शहराचे ह्रदयस्थान असलेल्या गुलमंडीवर झाली. या मोर्चाचे नेतृत्व राऊत यांनी केले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे आदी उपस्थित होते. अंबादास दानवे यांनी सभेचे प्रास्ताविक केले.

May be an image of 1 person, standing, walking, crowd and outdoors

प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढीविरोधात सामान्य जनतेचा हा आक्रोश असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी मोर्चाप्रसंगीच्या भाषणात केले. शहरात आज शिवसेनेने क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला. गुलमंडीवर पोहोचल्यावर संजय राऊत यांनी या आंदोलनामागील शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

May be an image of 2 people, people standing, outdoors and crowd

महागाईवर आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, गेल्या दोन वर्षात सुमारे 17 हजार लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आर्थिक संकट आणि महागाईच्या कारणामुळे आत्महत्या केली. मात्र केंद्र सरकारला याची चिंता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसाठी तब्बल 18 कोटी रुपयांचे विमान खरेदी केले.. त्यामुळे अशा सरकारचं करायचं काय असा प्रश्न पडला आहे, असेही ते म्हणाले. काही वर्षांपूर्वी 75 पैशांना असलेला साधा माचिस बॉक्सही 2 रुपयांना झाल्याचं त्यांनी यावेळी लक्षात आणून दिलं.

राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसनेचे असूनही आंदोलन का करताय, असा प्रश्न विचारला जातोय, त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. राज्यात सत्तेत असूनही सरकारला काम करू द्यायचे नाही, अशी कारस्थानं चालवली जात आहेत. रोज महाविकास आघाडीच्या दारात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची यंत्रणा आणून उभी करायची, सरकारची नाकेबंदी करायची, अशी कारस्थानं केवळ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हलवण्यासाठी सुरु आहेत. याद्वारे मुख्य प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्याचं काम सुरु आहे, म्हणून आम्ही आंदोलन करतोय, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.