ओबीसीवरुन फडणवीसांचा राष्ट्रवादीवर आरोप; शरद पवारांनी उदाहरणासह दिलं उत्तर

मुंबई ,२६ जून /प्रतिनिधी :- पक्षाच्या वर्धापनदिनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी केली. त्यानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलबतं सुरू आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेत्यांना मोठी संधी दिली जात नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याला शरद पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

राज्याच्या राजकारणात ओबीसी नेत्यांचा मुद्दा नेहमीच गाजत राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या भाकरी फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदापेक्षा पक्षसंघटनेतलं काम अधिक प्रिय वाटू लागलंय. प्रदेशाध्यक्षपदावर राहून पक्षवाढीसाठी जास्त काम करता येईल, असं अजित पवारांना वाटतंय. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याचा मुद्दा मांडलाय. धनंजय मुंडे किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी देण्याचं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू झालेल्या सुंदोपसुंदीवर सत्ताधाऱ्यांनी भाष्य करणं अपेक्षितच होतं. देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेत्यांना मोठ्या पदावर संधी दिली जात नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर शरद पवार यांनी जशास तसं उत्तर देत फडणवीसांचे आरोप उदाहरणं देत खोडून काढले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. याची आठवण शरद पवारांनी करून दिली. मधुकर पिचड, सुनील तटकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यपातळीवर नेतृत्व केलं होतं, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं.

राज्यात ओबीसी समाजाची मोठी वोटबँक आहे. ओबीसी समाज आपल्या पक्षाच्या बाजूने असावा हे समीकरण साधण्यासाठी काँग्रेने नाना पटोलेंना तर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता कुणाला प्रदेशाध्यक्ष करणार? यावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे.