केसीआर सोलापूरात दाखल,दिल्लीत बीआरएसला खिंडार  

 सोलापूर ,२६ जून / प्रतिनिधी :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या ६०० गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. सोलापुरातील मार्केट यार्डसमोर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून सोलापूरातील कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सत्कार केला. केसीआर यांचा आज सोलापुरात मुक्काम असून मंगळवारी त्यांच्यासोबत त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत.

महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय.

बीआरएसच्या रिंगण सोहळा आणि विठ्ठल मंदिरावरील हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीला अद्यापही परवानगी देण्यात आली नाही. बीआरएसतर्फे पंढरपूर येथे एका महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपाचे हेलिपॅड देखील उभारण्यात आलं आहे. मात्र पुष्पवृष्टीसाठी अद्यापही प्रशासनाने दिली परवानगी दिली नाही. राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येऊन प्रशासन विविध पद्धतीच्या परवानग्या नाकारत असल्याचा आरोप भारत राष्ट्र समितीने केला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना विठ्ठल-रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन देण्यास हिंदुराष्ट्र सेनेने विरोध केलाय. सोलापुरातील हिंदुराष्ट्र सेनेचे तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. वारकरी २५-३० दिवस चालत येऊन रांगेतून दर्शन घेत असताना केसीआर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना व्हीआयपी दर्शन का, असा सवाल हिंदुराष्ट्र सेनेने केला.

तेलंगणातील बीआरएसच्या दीड डझन नेत्यांचा पक्षाला रामराम

महाराष्ट्रात बस्तान मांडण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री केसीआर यांना मोठा झटका, बीआरएसचे दीड डझन नेत्यांनी  काँग्रेसमध्ये केला प्रवेश 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बस्तान मांडण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री केसीआर यांना त्यांच्या राज्यातच जोरदार झटका बसला असून तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस)दीड डझन नेत्यांनी  आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसला खिंडार पाडले आहे.

बीआरएसचे माजी खासदार पी. एस. रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव आदी नेते आज दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खम्ममचे पीएस रेड्डी, माजी मंत्री कृष्णा राव, आमदार दामोदर रेड्डी आणि तीन-चार माजी आमदारांसह सुमारे दीड डझन नेते दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी सोमवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात या नेत्यांचे स्वागत केले.

बीआरएसच्या बंडखोर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याअगोदर चर्चा करण्यासाठी सोमवारी नवी दिल्लीत तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांची पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. अविभाजित खम्मम आणि महबूबनगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे. या बैठकीत बीआरएस आणि भाजपमधील आणखी नेते सहभागी होणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

या दोन्ही नेत्यांना पक्षविरोधी कारवायांसाठी एप्रिलमध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मधून निलंबित करण्यात आले होते. बीआरएसमध्ये सामील होण्यासाठी कृष्ण राव यांनी २०११ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. ते महबूबनगर जिल्ह्यातील कोल्लापूर मतदारसंघातून २०१४ मध्ये बीआरएसच्या तिकिटावर निवडून आले होते. आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत.दरम्यान, या सगळ्या घडामोडींदरम्यान आणखी काही नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

बीआरएस आल्याने फरक पडणार नाही -जितेंद्र आव्हाड यांचा दावा 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधला. बीआरएस पक्ष ज्या उद्देशाने महाराष्ट्रात येत आहे ते यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. राज्यातील जनता मुर्ख नाही. त्यामुळे त्यांच्या गाड्यांचा असा ताफा आल्याने काही फरक पडणार नाही, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

बीआरएस पक्षाच्या घोषवाक्यात ‘अब की बार किसान सरकार, अब की बार दलित सरकार’ असा उल्लेख आहे. मात्र किसान म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे महाविकास आघाडी. त्यामुळे बीआरएस पक्ष दलित मते कापणार. या वर्गात वेगवेगळे गट असले तरी आता मात्र दलित वस्त्यांमध्ये एकता पाहायला मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मर्यादित ठेवले होते. मात्र आजचे सुशिक्षित तरूण संविधान आणि आरक्षण या दोन्हीबाबत डॉ. आंबेडकरांविषयी सकारामात्मक भूमिका मांडत आहेत. मंडल आयोगाचा राजकीय स्वीकार करणारा पहिला माणूस ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे मनातील स्वप्न पूर्ण केले ते शरद पवार होते, असा दाखला आव्हाड यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भाजप प्रदेशाध्यक्ष ओबीसी मुद्द्यावर मत व्यक्त करत आहेत. यावर आव्हाड म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रेम पाहायचे असेल तर सर्वात उत्तम उदाहरण मी स्वत: आहे. बावनकुळे यांचे भाजपने आयत्या वेळी तिकीट कापले. राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो. तुम्हाला साधं तिकीट दिलं नाही. त्यामुळे जातीपातीचे खालच्या दर्जाचे राजकारण कोणी करू नये, असा इशारा त्यांनी दिला.