वैजापूर शहरातील स्वस्त धान्य दुकानाचा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी पकडला

वैजापूर, १८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- शासकीय अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील तांदूळाचा साठा काळाबाजारात विक्री करण्याचा गैरप्रकार वैजापूरात मोठया प्रमाणात सुरु असून पोलिसांनी बुधवारी (ता.16) दुपारी शहरातील जीवन गंगा वसाहती समोर वाहनातून सात क्विंटल सरकारी तांदुळाचा साठा खुल्या बाजारात विक्रीला जात असल्याचे संशयावरुन जप्त करण्याची कारवाई केली.

त्याचप्रमाणे गुरुवारी सावतानगर वसाहतीत एका स्वस्त धान्य दुकानदाराने खाजगी वाहनात तांदुळाचा भरलेला साठा काळाबाजारात विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत असताना परिसरातील नागरिकांचे सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांने कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी वाहनातील तांदुळ साठा पुन्हा दुकानात उतरवून घेऊन या प्रकाराची सारवासारव केली. दरम्यान तालुक्यात शासकीय वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याची काळयाबाजारात विक्री करण्याचा प्रकार सुरु असतांना पुरवठा विभागांची यंत्रणा गाफील असल्याचे समोर आले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास वैजापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीराम काळे, हवालदार संतोष सोनवणे, योगेश झाल्टे, अमोल मोरे यांचे पथक शहरात गस्त घालत असताना वैजापूर – खंडाळा रस्त्यावरील जीवन गंगा वसाहती जवळ त्यांनी वैजापूरचे दिशेने येणारी ओमनी कार क्रमांक एम. एच. 04 ए. डब्ल्यू. 8872 या वाहनाला थांबवून तपासणी केली.त्या वाहनात पोलीसांना अंदाजे सात क्विंटल तांदुळाचा साठा आढळून आला. वाहनातील नबीब अली खाॅ पठाण (वय 23)  व सोहेब खान अजीज खाॅ (वय 22 रा. कुंजखेडा ता. कन्नड) या दोघांकडे तांदुळाचा साठा कुठून कुठे घेऊन चालले यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलिस पथकाला वाहनातील तांदूळ साठा सरकारी असल्याचा संशय आल्यामुळे वाहन जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला त्यांनी तांदूळ साठा सरकारी वितरण व्यवस्थेमधील आहे किंवा नाही यांची पडताळणी करुन अभिप्राय सादर करण्याचे पत्र दिले आहे.अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात नियमानुसार कारवाई केली जाईल असे हवालदार संतोष सोनवणे यांनी सांगितले. 

नागरिकांचे जागरुकतेमुळे तस्करी फसली

शहरातील सावता नगर परिसरात दुपारी एका स्वस्त धान्य दुकान चालकांने कार्डधारकांना वाटपासाठी आणलेला तांदूळांचा साठा मालवाहतूक करणाऱ्या जीप मध्ये भरुन काळयाबाजारात विक्रीला नेण्याची तयारी केली होती. याची कुणकुण परिसरातील नागरिकांना लागली. त्यांनी सदरील वाहन अडवून तहसील व पोलीसांना याठिकाणी कारवाई करण्यासाठी फोन सुरु केल्यामुळे हादरलेल्या दुकान चालकांने तांदुळाचा साठा वाहनातून उतरवून घेतला या प्रकाराचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. बहुजन समाज पक्षाचे जिल्हा सचिव बाबासाहेब पगारे यांनी तहसीलदारांना या गैरप्रकारावर कारवाई करण्याचे लेखी निवेदन दिल्यानंतर सावता नगर मधील तांदूळ साठा परस्पर विक्री प्रकरणाची चौकशीसाठी तहसीलदार राहुल गायकवाड यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार मनोहर वाणी यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.