पत्‍नीवर अनैसर्गिक अत्‍याचार केल्या प्रकरणी पतीला बेड्या

औरंगाबाद, १​८​ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- पत्‍नीवर अनैसर्गिक अत्‍याचार केल्याप्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे पती-पत्‍नी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दरम्यान गुन्‍हा दाखल झाल्यापासून आरोपी पती पसार होता, त्‍याला शुक्रवारी दि.१८ सकाळी अटक करण्‍यात आले. आरोपी पतीला २० नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एल. रामटेके यांनी दिले.

या प्रकरणात ३० वर्षीय पीडित पत्‍नीने फिर्याद दिली. त्‍यानूसार, २७ नोव्‍हेंबर २०१५ रोजी पीडितेचे लग्न आरोपीशी झाले. आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणुन मुंबईत एका कंपनीत नोकरी करित होता. लग्नानंतर दोघे मुंबईला राहण्‍यासाठी गेले. २०१६ मध्‍ये आरोपीने पुण्‍याला फ्लॅट घेण्‍यासाठी पीडितेच्‍या आई-वडीलांकाडून २५ लाख रुपये घेतले. मे २०१६ मध्‍ये आरोपीला अश्लिल वेबसाईट आणि अश्लिल क्रिया करण्‍यामध्‍ये आवड असल्याचे पीडितेला समजले. त्‍यातील अश्लिल क्रिया आरोपी पीडितेसोबत करायचा. पीडितेने त्‍याला अनेकदा समजावून सांगितले, मात्र तो पीडितेला मारहाण करित होता. २०१७ मध्‍ये याच कारणामुळे दोघांमध्‍ये पुन्‍हा वाद झाले. त्‍यावेळी देखील त्‍याने पीडितेला मारहाण करुन तुला घरी पाठवुन देईन, तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. २०१८ मध्‍ये आरोपीने चारचाकी घेण्‍यासाठी पीडितेकडे पुन्‍हा तगादा लावला. त्‍यावेळी देखील पीडितेच्‍या आई-वडीलांनी दोन लाख रुपये दिले. त्‍यानंतरही आरोपीचे तसेच वागणे सुरु होते. तो अनेकवेळा हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्‍ये जावून इतर लोक करतात त्‍याप्रमाणे घाणेरडे चाळे करण्‍याबाबत पीडितेवर दबाव टाकायचा, नकार दिल्यास मारहाण करित होता.

डिसेंबर २०१८ मध्‍ये पीडिता परदेशी नोकरीसाठी गेली, तेथे देखील आरोपीने हा प्रकार सुरुच ठेवला. या प्रकाराला कंटाळून पीडितेने परदेशातील नोकरी सोडली व ती पुन्‍हा मायदेशी परतली. त्‍याच्‍या नेहामीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने त्‍याला संसार करणे शक्य नसल्याचे सांगितले. व पुण्‍याचे घर नावावर करण्‍याचे सांगितले. त्‍यावर आरोपींने घर नावावर करण्‍यासाठी पीडितेकडे पैशांची मागणी केली. त्‍यावेळी पीडितेने त्‍याला ११ लाख २४ हजार ४२२ रुपयांचा धनादेश दिला. संबंधाने फारकतीसाठी आरोपीने होकार दिल्यानंतर, पीडितेने त्‍याला लग्नात दिलेले दागिने, भेटवस्‍तु आणि पोटगीबाबत विचारले, त्‍यावर आरोपीने तुझे काही फोटो आणि व्हिडीओ काढुन ठेवले आहेत, ते व्‍हायरल करेन अशी धमकी दिली.या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी पीडितेच्‍या आई-वडिलांनी लग्नावेळी घेतलेले दागिणे, भेटवस्‍तु आरोपीकडून जप्‍त करायच्‍या आहेत. आरोपीकडे पीडितेचे काढलेले फोटो आणि व्हिडीओ बाबत चौकशी करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.