पवारांनी ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने उद्धव ठाकरेंची नियत फिरली

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर,८ मार्च / प्रतिनिधी :-हो, अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता पण पहिले १०५ ज्यांचे आहेत त्यांचा सन्मान होता. तशी मातोश्रीवर भाजपची ऑफर आली होती. पण शरद पवारांनी ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने उद्धव ठाकरेंची नियत फिरली, त्यांनी भाजपशी बोलणीच केली नाही, असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला. २०१९ साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असे त्यांनी म्हटले. यावरून संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

संजय शिरसाट म्हणाले की, अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता तर नक्कीच ठरला होता. मात्र पहिले १०५ ज्यांचे आहेत त्यांचा सन्मान होता. शेवटच्या दिवशी मातोश्रीवर भाजपची ऑफर आली होती. पण बोलणीच केली नाही. उद्धव ठाकरेंना त्यावेळी एकनाथ शिंदे विचारायला गेले, तेव्हा मी बोलणी करणार नाही, तुम्हाला करायची तर करा, असे त्यांनी म्हटले. कारण पवारांनी ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने उद्धव ठाकरेंची नियत फिरली, असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

संजय शिरसाट पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. युती होणार, नाही होणार, किती जागा मिळणार? भाजप घटक पक्षांना बुडवणार, या वल्गना केल्या जात आहेत. काही जण दिलेल्या शब्दाची वारंवार गोष्टी करत आहेत. मात्र माध्यमातून येणारी माहिती चुकीचे आहे. योग्य तो सन्मान आमचा ठेवला जाणार हे ठरलेले आहे. उलट तिकडे महाविकास आघाडीत ताळमेळ आहे का? वंचित कुठे? काँग्रेस कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.