अजित पवारांविषयी संजय राऊत यांचे वक्तव्य बाळबोध

सुप्रिया सुळेंनी संजय राऊतांचाच घेतला समाचार

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधार्‍यांवर टीका करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. आजच्या पत्रकार परिषदेत ‘शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या असून त्यामधील अनेक संस्थांवर अजित पवार आहेत. या संस्थांमधून अजित पवार यांनी बाहेर पडावे’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. मात्र त्यांच्याच आघाडीतील घटक पक्षाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांचाच चांगला समाचार घेतला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार आणि आमचे राजकीय मतभेद आहेत, परंतु आमच्यात मनभेद  नाहीत. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. या सर्व संस्थांचे काय करायचे ते आम्ही ठरवू. आम्ही नाती नेहमी जपली आहेत. घरातील नातीतर सोडा आज देशात अनेक ठिकाणी आमची नाती तयार झाली आहेत. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहेत, पवार कुटुंबियांचे संस्कार आहेत. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आहोत, संजय राऊत यांचे वक्तव्य हे बाळबोध आहे.

संजय राऊत हे नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करत असतात. ‘सामना’ वर्तमानपत्रातूनही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. याचा विरोध करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी निदर्शनेही केली. आज मात्र महाविकास आघाडीतीलच नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्याला बाळबोध म्हटले. तर दुसरीकडे त्यांनी अजितदादांची बाजू घेतल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची नेमकी भूमिका काय याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.