‘राज ठाकरे ‘हिंदू ओवैसी’, संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर असदुद्दीन ओवैसींचं खोचक उत्तर

औरंगाबाद ,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाचा मुद्दा हाती घेतल्याने शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना तर ‘हिंदू ओवैसी’ असल्याची उपमा दिली. तसेच मनसे ही भाजपती सी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. दरम्यान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आज इफ्तार पार्टीच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी त्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांच्या राज ठाकरे ‘हिंदू ओवैसी’ अशा उल्लेखाबाबत प्रश्न विचारला. त्यावर ओवैसी यांनी खोचक टोला लगावला.

“माझ्या वडिलांचं नाव ओवैसी आहे. आता संजय राऊत असं का बोलत आहेत. त्यांनी असं बोलायला नको. मी एवढंच बोलू इच्छितो. संजय राऊत ठाकरे घराण्याशी संबंधित व्यक्ती आहेत. आपल्या नेत्याच्या घराचा वाद माझ्यावर का काढत आहेत? मला त्याच्याशी काय घेणंदेणं आहे? दोन भावंडांमध्ये भांडण आहे ना. दोघांना एकत्र बसवून त्यांना एकत्र करा. तुम्ही इतके दिवस भाजपसोबत हनिमून साजरी केलं ते काय होतं? तुम्ही 2014 आणि 2019 ला मोदींना मत द्या म्हणाले. तुम्ही कलम 370 च्या निर्णयाला पाठिंबा दिला”, अशी टीका ओवैसींनी केली.