करोना नियमांचे पालन करून खुलताबाद उरुसाची ७३५ वर्षांची परंपरा जपली

खुलताबाद ,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-

हजरत  ख्वाजा शेख मुन्तजबोद्दिन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांच्या उरुसाला ७३५ वर्षांची परंपरा लाभली आहे. यंदा करोना नियमांचे पालन करून  संदल  उरुसास सुरुवात करण्यात आली. उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तहसीलदार सुरेंद्र देशमुख, उपाध्यक्ष दर्गाह कमिटीचे अध्यक्ष फजिलत अहमद, सचिव मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, नगराध्यक्ष एस. एम. कमर, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन, मोहंमद नईम मोहंमद बक्ष, पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे , आरोग्य व विद्युत समितीचे सभापती मुनीबोद्दीन, नगरसेवक मिर्झा अयाज बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत खुलताबाद उरुसास प्रारंभ झाला.


राष्ट्रीय एकात्मता अखंडता जोपासणारा, तसेच हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारा उरूस म्हणून ओळख असलेल्या खुलताबाद येथील उरूसाला ७३५ वर्षांची परंपरा लाभलेली आहे. इस्लामी दिनदशिर्केनुसार रब्बी अवलच्या चार ते आठ तारखेस उरुस भरतो. १२ तारखेला ईद-ए-मिलादच्या दिवशी समारोप होतो. पहिल्या दिवशी चुना फरारे, दुसऱ्या दिवशी संदल, तिसऱ्या दिवशी चिरागा, चौथ्या दिवशी शबे-बदावा असे धार्मिक कार्यक्रम मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीत साजरे केले जात आहे, करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यावर्षी धार्मिक स्थळे सुरू करण्याचे आदेश दिले असले तरीही उरुसानिमित्त  आयोजित करण्यात येणारे मुशायरा, कव्वाली, कुस्त्यांची दगल, पशू प्रदर्शन, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले नाही. ऊरुस मैदानावर  कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उरुसानिमित्ताने दुकाने, रहाट पाळणे, टुरिंग टॉकीज, मनोरंजनाची वेगवेगळी साधने, खाद्य पदार्थांचे हॉटेल लावण्यास बंदी करण्यात आली आहे. खाजा मैदा, तूप, साखर यापासून तयार केलेले पदार्थ येथील उरुसाचे खास वैशिष्ट्य आहे. या उरुसानिमित्त नगरपरिषदेचे एस. बी. वाघ, शब्बीर अहमद, जितेंद्र बोचरे, जे. के. चौधरी, अंकुश भराड, सचिन तोंडेवाड, अशोक भंडारे यांनी भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था केली आहे.

Displaying IMG-20211014-WA0018.jpg


उरूस मैदानात कडेकोट पोलिस बंदोबस्त
उरुसावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. यंदा कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी दिली. खुलताबाद ऊरुसानिमित्त पोलिस उपअधिक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी वाहतुक पोलिस यासह बाँबशोधक पथक एलसीबी पथक, डीएसबी पथक, शीघ्रकृती दल तैनात करण्यात आले आहे. खुलताबाद उरुसानिमित्त जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) निमीत गोयल उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत मानकर हे  उरुस व्यवस्थेवर लक्ष ठेऊन आहेत.