क्रिकेट संघटक ​जे.यू.मिटकर यांचे निधन

औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी सचिव व उद्योजक जे.यू. (जनार्धन उमाजी) मिटकर (वय ८०) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी (दि.३१ ऑक्टोबर) रात्री ११.३० वाजता निधन झाले. 

बन्सीलालनगरातील उमाजी कॉलनीत त्यांच्या निवासस्थानापासून मंगळवारी सकाळी १० वाजता अंत्यायात्रा निघणार आहे. बनेवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे   जिल्हा क्रिकेट संघटनेचेही ते माजी सचिव होते.  त्यांनी गेले २५ वर्ष या संघटनेत  विविध पदावर काम पाहिले. तसेच तिळवण तेली समाज संघटनेतही त्यांनी विविध पदावर कार्य करुन समाजात आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, जावाई, नातवंड असा परिवार आहे. 

औरंगाबाद मध्ये पूर्वी क्रिकेट म्हटले की जे .यु . मिटकर असे समीकरण होते. औरंगाबाद जिल्हा क्रिकेटसाठी त्यांचा त्याग मोलाचा होता. गेल्या साडे चार दशकांत रणजी ,दुलीप ट्रॉफी स्पर्धा घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी तब्बल एक वर्ष महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव म्हणूनही कार्य केले होते. त्यांची नेमणूक धर्मादाय आयुक्तांनी केली होती.

त्यांच्या कार्यकाळात पुण्याच्या नेहरु स्टेडियमवर न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे सामना आयोजित करण्यात आला होता.क्रिकेटवर प्रेम करणारा एक सच्चा कार्यकर्ता काळाने दुरावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. एक चांगला क्रिकेट संघटक म्हणून त्यांची ओळख होती.