नोकरी लावण्याचे आमिष,फसवणूक प्रकरणात आणखी २ आरोपींना अटक 

औरंगाबाद,५ मे  / प्रतिनिधी

रेल्वे खात्यामध्ये तिकीट तपासणीस पदाची (टी.टी.) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे देऊन तिघांची १६ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणात सिडको पोलिसांनी आणखी दोन आरोपींना मंगळवारी दि.४ रात्री अटक केली. आरोपींना शनिवार दि.८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एच.एस. पुराडउपाध्‍ये यांनी बुधवारी दि.५ दिले.

28-year-old accused flees from police custody after hearing in court |  Hindustan Times

गोविंद दत्तात्रय खाटीक (2३, रा. खटकवाडी, सुलतानपुर ता. नेवासा जि. अहमदनगर) आणि कुणाल रमेश दानवे (२१, रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

एका उर्दु शाळेत शिपाई पदावर गेल्या पंधरा वषार्पासून नोकरी करत असलेल्या भरत नवनाथ खेडकर (३२, रा. शनी मंदीरामागे, नवजीवन कॉलनी, एन-११, हडको, मुळ रा. वडाची वाडी, पो. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड) याने फिर्याद दिली. त्यानूसार, खेडकर व त्यांचे दोन नातेवाईक विशाल तुकाराम ताठे व सुनील विठ्ठल नागरे (दोघेही रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) यांना आरोपी अनिकेत कोकाटे आणि महेश ससे या दोघांनी रेल्वेत तिकीट तपासणीस पदाची (टी.टी.) नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून तसेच बनावट नियुक्तीपत्र देवून टप्प्या टप्प्याने 16 लाख घेतले. फसवणूक झाल्याचे उघड झाल्याने तिघांनी कोकाटेकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, त्याने पैसे अथवा नोकरीवर रूजू करुन घेतले नाही. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी अनिकेत कोकाटे आणि महेश ससे या दोघांना 22 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. तर न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर पोलिसांनी  दोघा आरोपींना अटक केली. आज त्‍यांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी गुन्‍ह्यातील मुख्‍य सुत्रधार सौरभ तिवारी, अजय नवथर, हणुमंत तानवडे यांना अटक करणे आहे. आरोपी तिवारी याने रेल्वेचे बनवाट शिक्के कोठे बनवले याचा तपास करणे आहे. तसेच आरोपींनी फसवणूक करुन मिळवलेल्या १६ लाखांची विल्हेवाट कशी लावली याचा तपास करणे आहे. तसेच आरोपींनी अशा प्रकारे अनेक बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याची दाट शक्यता असल्याने त्‍या दृष्‍टीने तपास करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.