शिर्डी येथून गायब झालेल्या दीप्ती औरंगाबाद खंडपीठात

औरंगाबाद: साडेतीन वर्षांपासून शिर्डी येथून गायब झालेल्या
दीप्ती सोनी या विवाहित महिलेस शिर्डी पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हजर करण्यात आले. न्या. रवीद्र घुगे व
न्या. वी. यु. देबडवार यांनी महिलेस साईभक्त मनोज सोनी यांच्या ताब्यात
दिले. शिर्डीतून भक्तांच्या गायब होण्याचा शोध घेण्यासाठी मनोज सोनी
यांनी दाखल याचिका निकाली काढली परंतु तिचे सुमोटो फौजदारी जनहित याचिकेत
रूपांतर केले. दीप्ती सोनी साडेतिन वर्षे कुठे होती याचा मुळापासून शोध
घेण्याचे निर्देश खंडपीठाने पोलिस यंत्रणेस दिले.
मनोज सोनी पत्नी, मुले व कुटुंबियासमवेत १० ऑगस्ट २०१७ रोजी शिर्डीत आले
होते. त्यांच्या पत्नी एका दुकानातून गायब झाल्या होत्या. त्यांनी एक
महिना शिर्डीतच शोधाशोध केली परंतु त्या सापडल्या नाहीत. पोलिसात तक्रार
दिल्यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. साडेतीन वर्षे
झाल्यानंतरही दीप्ती सापडल्या नसल्याने खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीत
पोलिस यंत्रणेवर नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले होते. राज्याच्या पोलिस
महासंचालकांना खंडपीठाने निर्देश दिले होते. गुरूवारी (१७ डिसेंबर) २०२०
रोजी दीप्ती अचानक त्यांच्या वहिणीच्या घरी इंदूरला परतल्या होत्या.
त्यांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी (२१ डिसेंबर)
औरंगाबाद खंडपीठासमोर हजर केले.