वैजापूर नगरपालिका निवडणुकीत द्विसद्स्यीय प्रभाग पद्धत, इच्छुकांमध्ये “कही खुशी-कही गम” !

जफर ए.खान 

वैजापूर,१४ ऑक्टोबर:- आगामी नगरपालिका निवडणुका द्विसद्स्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.ही द्विसद्स्यीय प्रभाग पद्धत अनेक उमेदवारांना डोकेदुखी ठरणार आहे.राज्यात सत्ता बदल होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने नगरपालिकेच्या निवडणुका पूर्वीच्या छोट्या वार्ड रचनेप्रमाणे होऊन प्रत्येक वार्ड एक उमेदवार दिला जाईल असा अंदाज राजकीय वर्तुळात होता.परंतु पंधरा-वीस दिवसांपूर्वी राज्य सरकारने मागील पंचवार्षिक प्रमाणेच पालिकेच्या निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे स्वप्न  भंगले असून, “कही खुशी-कही गम”अशी परिस्थिती आहे.

पालिका निवडणुकीत मोठा प्रभाग राहणार असल्याने मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागते.मागील निवडणुकीत राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असतांना जनतेतून नगराध्यक्षाची थेट निवड करण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक प्रभागात द्विसद्स्यीय पद्धत अंमलात आणली.त्यामुळे प्रभाग मोठे होऊन एक प्रभागात दोन उमेदवार व नगराध्यक्षही थेट जनतेतून निवडून द्यायचा असल्याने मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत होती. एका प्रभागात दोन उमेदवार रिंगणात असल्याने ज्या उमेदवाराला पसंती नाही किंवा ज्याचा जनसंपर्क कमी आहे अशा उमेदवारांना दुसऱ्या प्रबळ उमेदवाराचा फायदा होतो.परंतु अनेकदा लोकप्रिय असतानाही दुसऱ्या उमेदवाराच्या नापसंतीमुळे निवडून येण्याची खात्री असतानाही त्याला पराभवाचा सामना करावा लागतो. कारण एक प्रभागात दोन्ही उमेदवारांना मतदार पसंद करतील असे नाही.अनेकदा प्रभागात क्रॉस वोटिंग होते. प्रभागात निवडून येण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराचाही खर्च सांभाळावा लागतो. त्यामुळे काहींना निवडून येण्याची शाश्वती  नसतांनाही त्यांची लॉटरी लागते व दोन सदस्य पद्धतीमुळे विजयी होणारा कमकुवत उमेदवारामुळे पराभूत होतो.यामुळे निकाल लागेपर्यंत प्रभागातील दोन्ही उमेदवारांच्या मनात धाकधूक निर्माण होते.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी छोटी वार्ड रचना बरी  असे  निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे मत आहे.

एकच उमेदवार असल्यास स्वतःची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळता येते.उमेदवाराला स्वतःसाठी मत मागण्यासाठी व छोटा वार्ड असल्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांना मोठा कालावधी मिळतो.तसेच मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे समजण्यास सोपे जाते.त्यामुळे अनेकांना प्रभाग छोटा होईल अशी अपेक्षा होती.परंतु राज्य सरकारने एका प्रभागात दोन सदस्य पद्धत वापरण्याचा निर्णय घेतल्याने अनेक इच्छुक उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून झाल्यानें नगरसेवक पदाला फारसे महत्व नव्हते.कारण सरकारने थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना विशेष अधिकार दिले होते. त्यांच्यावर अविश्वास आणता येत नव्हता किंवा नगरसेवकाच्या दबावलाही ते जुमावले नाहीत. नगरसेवकांच्या मर्जीतली कामे झाली नसल्याने  नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला नगरसेवकांच्या नाराजीला सामोरे जावे लागल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले.

येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष निवड प्रक्रिया ही नगरसेवकांमधून होणार असल्यामुळे नगरसेवक पडला चांगलेच महत्व प्राप्त होणार आहे.नगरसेवक हे नगराध्यक्षावर अंकुश ठेऊ शकतील व प्रभागातील विविध विकास कामे करता येईल.यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला नगरसेवक होण्यासाठी संपूर्ण प्रभागांची जबाबदारी नसल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला नगरसेवक होण्यासाठी जबाबदारीने मतदारापर्यंत जावे लागणार आहे. दुसऱ्या उमेदवाराच्या खांद्यावर जबाबदारी झटकून चालणार नाही. आगामी होणाऱ्या नागरपालिका निवडणुकांची खरी रंगत प्रभागनिहाय उमेदवारांच्या आरक्षण सोडतीनंतर येणार आहे. अनेक इच्छुक उमेदवार आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.