नागमठाण – चेंडूफळ रस्त्याच्या कामाचे दुसऱ्यांदा उदघाटन, कार्यक्रम पत्रिकेत भाजप सदस्याचे नाव नाही,भाजप -सेना कार्यकर्त्यांत श्रेयवाद

सार्वजनिक बांधकाम विभागाने वादातून अंग काढून घेतले

जफर ए.खान 

वैजापूर ,१७ ऑक्टोबर :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण ते चेंडूफळ या रस्त्याच्या कामाचे उदघाटन कार्यक्रमपत्रिकेत भाजप पंचायत समिती सदस्याचे नाव न टाकल्यामुळे भाजप – सेना कार्यकर्त्यांमध्ये समाजमाध्यमावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. विशेष म्हणजे या कामाचे दोन वर्षांपूर्वी विधानसभेचे तात्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते भूमीपूजन झाले असून, दुसऱ्यांदा या कामाचे उदघाटन होत आहे. त्यामुळे या कामाच्या मंजुरीवरून भाजप- सेना कार्यकर्त्यांत श्रेयवाद सुरू झाला आहे.

Displaying IMG-20211016-WA0090.jpg

अर्थसंकल्पीय निधी 5054 (04) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नागमठाण ते चेंडूफळ या 29 कि.मी. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ रविवारी (ता.17) सकाळी सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्याहस्ते व शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते अध्यक्षतेखाली होणार होता.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्या नावाने छापण्यात आलेल्या व पत्रिकेवर शासकीय चिन्ह असलेल्या या कार्यक्रम पत्रिकेत भाजपच्या नागमठाण पंचायत समिती गणाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्य मुक्ताबाई डांगे यांचे न नाव टाकल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून, कामाच्या मंजुरीवरून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. 

Displaying IMG-20211017-WA0066.jpg

या रस्त्याचे काम भाजप-सेना युतीच्या काळात मंजूर झालेले असून, या कामावर 9 कोटी 36 लाख 96 हजार 167 रुपये खर्च येणार आहे.रस्त्याच्या कामास 16 सप्टेंबर 2019 ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.तत्कालीन विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते 15 सप्टेंबर 2019 रोजी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प.रामगिरी महाराज होते तर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.निधीअभावी गेल्या दोन वर्षांपासून हे काम रखडले होते. 
त्यानंतर सत्ताबदल होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे व जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या रस्त्याचा  विषय मांडून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून आणला.25 मार्च 2021 या रस्त्याच्या कामाची वर्कऑर्डर झाली.आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्याहस्ते व आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता.मात्र,कार्यक्रम पत्रिकेत नागमठाण गणाच्या भाजप सदस्या मुक्ताबाई डांगे यांचे नाव न टाकल्याबाबत भाजपचे पदाधिकारी सतीश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.काकड यांच्याकडे विचारणा केली असता कार्यक्रमपत्रिका मी छापलेली नाही.कार्यक्रम पत्रिकेशी माझा काही संबंध नाही असे म्हणून या वादातून अंग काढून घेतले. याविषयावर सकाळपासून समाज माध्यमावर चर्चा सुरू असून, सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.