पैसे न दिल्याने मित्राचा खून ,दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी

दंडाची ४० हजारांची रक्कम मृताच्या  वडिलांना  नुकसान भरपाई म्हणुन देण्‍याचे आदेश

औरंगाबाद, १४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-पैसे न दिल्याने केटरिंगचा व्‍यवसाय करणाऱ्या  मित्राचा खून केला म्हणून  दोघांना प्रत्‍येकी दहा वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली एकूण चाळीस हजारांच्‍या दंडाची शिक्षा तदर्थ जिल्हा न्‍यायाधीश ए.आर. कुरेशी यांनी ठोठावली.

विशेष म्हणजे दंडाची रक्कम मृताच्या  वडिलांना  नुकसान भरपाई म्हणुन देण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले. शेख आसीफ शेख हाफीज (२६, रा. जाकीर हुसेन नगर, सिल्लोड) आणि शेख ताज शेख बिेस्‍मील्ला (३४, रा. इंदीरा नगर, सिल्लोड) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात शेख इस्‍माइल शेख (२४, रा. गुलशन नगर, सिल्लोड) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादी व मृत मजीद जैनोदीन पटेल (२५, रा. हुसेन नगर, सिल्लोड) हे केटरिंगचा व्‍यवसाय करत होते. फिर्यादी व मृत  पटेल यांनी आमदार सत्तार यांनी आयोजित  केलेल्या सामूहिक  विवाह सोहळ्याचे केटरिंगचे काम घेतले होते. या कामाचे अॅडव्‍हान्‍स म्हणून ३० हजार मिळाले होते, त्‍यापैकी १२ हजार खर्च झाले तर १८ हजार रुपये मृत  पटेल यांच्‍याकडे होते. ३० एप्रिल २०१६ रोजी मृत  व फिर्यादी हे सकाळी १०.४५ वा दुचाकी सिल्लोडहून जालन्‍याकडे केटरिंग मजुर आणण्‍यासाठी जात होते. त्‍यावेळी मृत  पटेल यांचे मित्र  तथा आरोपींनी पटेल यांना आवाज दिला. त्‍यांनी  पटेल यांच्‍याकडे पैशांची मागणी केली. त्‍यावर पटेल यांनी नकार दिला.

आरोपी शेख आसिफ याने पटेल यांना भोकरदन रोडवरील पाण्‍याच्‍या टाकीजवळ जाऊन येवू असे म्हणाला. मित्र  असल्याने पटेल आरोपींसोबत पाण्‍याच्‍या टाकीजवळ गेले. तेथे पटेल व दोघे आरोपी गांजा ओढत बसले. तर फिर्यादी गांजा ओढत नसल्याने आरोपी आसिफने त्‍यांना मारहाण केली. त्‍यामुळे फिर्यादी बाजुला काही अंतरावर थांबले. काही वेळाने फिर्यादीला भांडणाचा आवाज आल्याने त्‍यांनी मागे वळुन पाहिले. त्‍यावेळी आरोपी हे मृताकडे पैशांची मागणी करुन मारहाण  करीत होते. आरोपी शेख आसिफ याने मृताच्‍या गळा व कानाच्‍या मधोमध ठोसा मारुन खाली पडले व गळा दाबू लागला. तर आरोपी शेख ताज याने बरगडीवर लाथा मारल्या. पटेल यांच्‍या खिशातून आरोपींनी १८ हजारांची रोख रक्कम काढून घेत तेथुन धूम ठोकली.  पटेल यांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात आणले असता, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषीत केले.या  प्रकरणात सिल्लोड शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या गुन्‍ह्यात तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक एस.बी. कापुरे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी मुख्‍य जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यातील एक फितुर झाला. तर प्रत्‍यक्ष दर्शी साक्षीदार फिर्यादी यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपींना  दोषी ठरवले. दोघा आरोपींना सदोष मुनष्‍यवध भादंवी कलम ३०४ (२) अन्‍वये व कलम ३९४ अन्‍वये प्रत्‍येकी दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात देशपांडे यांना  सिध्‍दार्थ वाघ यांनी सहाय केले.