एनसीबी फर्जीवाडा करून लोकांना बदनाम करण्याचे काम करत आहे-नवाब मलिक यांचा आरोप

एनसीबी कारवाईवरुन नवाब मलिक यांचा नवा गौप्यस्फोट, एनसीबीवर केला गंभीर आरोप

मुंबई ,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) या केंद्रीय तपास यंत्रणेच्या महाराष्ट्रातील कार्यवाहीच्या उद्दिष्टांबद्दल पुराव्यांसह प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज या मालिकेतील तिसरी पत्रकार परिषद राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे घेतली.’समीर खान यांच्यावरील कारवाईच्या वेळी एनसीबीनं व्हॉट्सअॅपवर काही फोटो व्हायरल केले होते. ज्या नंबरवरून हे फोटो व्हायरल केले गेले, तो नंबरही आज मलिक यांनी जाहीर केला. हा नंबर कोणाचा, यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. 

May be an image of 3 people, people sitting, eyeglasses and indoor

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या एनसीबीतर्फे झालेल्या अटकेबाबत पत्रकारांकडून वारंवार विचारणा होत होती व वैयक्तिक कारणांपायी श्री. मलिक एनसीबीला लक्ष्य बनवत आहेत का, असा पत्रकारांच्या प्रश्नांचा रोख आधीच्या पत्रकार परिषदांमध्ये दिसला होता.या रोखाच्या अनुषंगानेच आज पत्रकारांना संबोधित करताना जावई समीर खान यांच्या अटकेबाबत न्यायालयीन संदर्भ देत नवाब मलिक यांनी सत्य परिस्थिती मांडली व समीर खान यांच्यावरील कारवाईच्या अनुषंगाने एनसीबीने लक्ष्य केलेल्या लोकांची प्रातिनिधिक भूमिका सविस्तरपणे मांडली.

May be an image of 4 people, people sitting, people standing and eyeglasses

“२७ सप्टेंबरला एनडीपीएसच्या विशेष कोर्टाने समीर खान, करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना साडे आठ महिन्यानंतर जामीन दिला. कोर्टाची लेखी ऑर्डर काल प्राप्त झाली आहे. जस्टीस जोगळेकर यांनी ही ऑर्डर जाहीर केली.” असे सांगत सगळा घटनाक्रम नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर मांडला.

नवाब मलिक यांनी विशद केलेला घटनाक्रम पुढीलप्रमाणे…

८ जानेवारी २०२१ रोजी एनसीबीने पत्रकारांना सांगितले की, दोन पार्सल युनिव्हर्सल कार्गोतून ट्रेस केले गेले.

९ जानेवारी रोजी करण सजनानी जे वांद्रे येथे राहतात, त्यांच्या घरी छापा टाकला गेला. एनसीबीने अधिकृत प्रेस नोट काढून २०० किलो गांजा जप्त केल्याची बातमी दिली. त्याच दिवशी ९ जानेवारी रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्याने आपल्या मोबाइल नंबरवरून प्रेस नोट आणि चार फोटो पाठवले. एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली असल्याचे या प्रेस नोटद्वारे सांगितले.

May be an image of 1 person, sitting and indoor

दि. ९ जानेवारी रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईची प्रेस नोट आणि जप्त केलेल्या अमली पदार्थाचे फोटो एनसीबीचे अधिकारी यांच्या 98201 11409 या मोबाईल नंबर वरून पत्रकारांना फॉरवर्ड करण्यात आले होते. या फोटो आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारावर मीडियाने बातम्या दिल्या.

९ जानेवारी रोजी राहिला फर्निचरवाला नावाच्या मुलीकडे साडेसात ग्राम गांजा जप्त केला गेला. त्या मुलीला त्याच दिवशी जामीन मिळाला. याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

१२ जानेवारी रोजी रात्री १० वाजता माझे जावई समीर खान यांना समन्स पाठविण्यात आले. १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे दहा वाजता माझे जावई एनसीबी कार्यालयात पोहोचले. तिथे आधीपासूनच वृत्तवाहिन्याचे कॅमेर लागलेले होते. सर्व वृत्तवाहिन्यावर माझ्या जावयाचा फोटो लावून ते अमली पदार्थाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले. अटकेनंतर न्यायालयीन प्रक्रियेत त्यांना बेल मिळावा म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो. सहाव्या महिन्यानंतरही आम्ही सातत्याने प्रयत्न करत असताना एनसीबीने सुमारे तीन महिने सहकार्य न करता वेळ काढण्याची भूमिका घेतली.

May be an image of 1 person and sitting

कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एनसीबीने एनडीपीएस कायद्याच्या २७(अ) कलमा अंतर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो, अशी माहिती त्यांनी दिली. एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि हर्बल तंबाखू यातला फरक कळू नये, हे फार गंभीर असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही मीडियाला खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले. मी सुरुवातीपासून हेच सांगत आलो होतो की, एनसीबी फर्जीवाडा करून लोकांना बदनाम करण्याचे काम करत आहे. करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, समीर खान यांना जाणीवपूर्वक अडकवले गेले तसेच रिया चक्रवर्तीच्या प्रकरणातही झाले असल्याचा आरोप मा. नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत केला.

माझ्या जावयाला फ्रेम केल्यानंतर गेले अनेक महिने आम्ही तणावात होतो. मात्र आमचे नेते शरद पवार साहेबांनी माझे धैर्य वाढवले. जावयाने काही चूक केली असेल तर त्याची शिक्षा कायदा त्याला देईल, मात्र त्याची शिक्षा सासऱ्यांना देता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

पत्रकार परिषदेचा समारोप करताना नवाब मलिक यांनी पत्रकारांनाही विनम्रपणे आवाहन केले की, कितीही कुणी सांगितले किंवा बातम्या पेरण्याचा प्रयत्न केला तरी खातरजमा केल्याशिवाय आपण बातम्या देऊ नयेत.