केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान-आ.सतीश चव्हाण यांची टीका

Satish Chavan | Facebook

औरंगाबाद,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी विरोधी असून केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या किमतीत झालेली घसरण ही केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे झाली असल्याची टीका आ.सतीश चव्हाण यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे.

            आ.सतीश चव्हाण यांनी फेसबूक पेजवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच केंद्र सरकारने 12 लाख टन जी.एम. (जेनेटिकल मॉडिफाइड) सोयाबीन पेंड आयातीला परवानगी दिली. त्यामुळे सोयाबीनच्या किमती या 11 हजारावरून पाच हजार रूपये क्विंटलपर्यंत खाली आल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकांवर अवलंबून आहे. नवीन सोयाबीन बाजारात येण्याच्या काळातच केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीचा निर्णय घेतला. त्यात या सोयाबीन पेंड वरील आयात कर कमी करून केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीट चोळण्याचे काम केले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

            हीच आयात जूनमध्ये केली असती तर त्याचा सोयाबीनच्या नव्या हंगामातील किमतीवर परिणाम झाला नसता. मात्र मुठभर लोकांच्या फायद्यासाठी शेतकर्‍यांना बेहाल करने केंद्र सरकारला चांगलेच जमत असल्याची टीका आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.