महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,२४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-मनोज गुंजाळआणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी मनोज गुंजाळआणि अकोला येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी सपना बाबर यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त कोविड19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार २०१९-२०’ चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती  तर सुषमा स्वराज भवनातून युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, युवक कल्याण विभागाच्या  सचिव उषा शर्मा आणि क्रीडा विभागाचे सचिव रवि मित्तल  उपस्थित होते.

देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. यावेळी एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील मनोज गुंजाळआणि अकोला येथील विद्यार्थिनी सपना बाबर यांनाही यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकांच्या श्रेणीत गौरविण्यात आले.

मनोज गुंजाळ यांनी जलसंरक्षण, हरितगाव, अवयवदान, प्रोढ साक्षरता, उज्ज्वला योजना, रक्तदान,वृक्षारोपन आदि कार्यक्रम व  उपक्रमात सक्रिय सहभाग घेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आपत्ती व्यवस्थापन विषयक हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनातही मनोज मुंजाळ यांनी महत्वाचा सहभाग दिला होता.

सपना बाबर यांनी सॉफ्ट  स्किल डेव्हलपमेंट, तंबाखुमुक्त अभियान आणि रस्ता सुरक्षा जागरूकता या कार्यक्रमांमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी  उल्लेखनीय कार्य केले. झोपडपट्टीतील जनतेला विविध जनोपयोगी उपक्रमात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच एड्स जागरुकता रॅली मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला  आहे.

2 कोटी 30 लाख मुखपट्ट्या NSS स्वयंसेवकांनी बनवून देशभरात वितरित

यावेळी राष्ट्र्रपती म्हणाले, की, “ माणसाच्या भावी आयुष्याचा भव्य प्रासाद विद्यार्थी जीवनाच्या पायावरच उभा राहत असतो. मानव आयुष्यभरासाठी विद्यार्थी असतोच पण तरीही मूळ व्यक्तिमत्वाचा खरा विकास विद्यार्थीदशेतच होतो.” त्यांच्या मते NSS ही एक भविष्यवेधी योजना असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय  किंवा महाविद्यालयीन जीवनातच समाज व देशसेवेची सुसंधी मिळते.

राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात 1969 साली महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या दिवशी झाली होती, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.  महात्मा गांधींनी त्यांचे पूर्ण जीवन मानवतेच्या सेवेत व्यतीत केले होते. आपल्या तरुणांनी स्वतःला  पूर्ण ओळखून  एक जबाबदार नागरिक बनले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. ‘स्वतःला पूर्ण ओळखण्यासाठी समाजसेवेत झोकून देणे हा सर्वोत्तम मार्ग आहे’, असे त्यांचे मत होते. गांधीजींचे जीवन हे मानवसेवेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचे आदर्श व सेवाभाव आपणा सर्वांना आजच्या काळातही प्रेरणादायी ठरतो आहे.

कोविड-19 महामारीच्या सुरुवातीच्या काळात मुखपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु होण्याआधी , 2 कोटी 30 लाख मुखपट्ट्या NSS स्वयंसेवकांनी बनवून देशभरात वितरित केल्या होत्या. हेल्पलाईन च्या माध्यमातून कोविड संबंधीची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठीही NSS स्वयंसेवक पुढे आले होते, तसेच त्यांनी अनेक जिल्हा प्रशासनांना जनजागृती व मदतकार्यातही सहायय केले होते, याचा राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला. .

राष्ट्रपती म्हणाले, की स्वातंत्र्यप्राप्तीच्या  या  75 व्या वर्षी देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा होत आहे.  यासाठी NSS चे स्वयंसेवक भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर व स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानावर अनेक  वेबिनार्स /सेमिनार्स आयोजित करत आहेत. आपला स्वातंत्र्यलढा  व स्वातंत्र्यसैनिकांबद्दल जनजागृती करणे, ही देखील एक प्रकारची देशसेवाच असल्याचे ते पुढे म्हणाले.

युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त 1993-94 साली या पुरस्कारांची सुरुवात केली होती. देशभरातील विद्यापीठे/ महाविद्यालये, (+2) परिषदा , उच्च माध्यमिक विद्यालये, NSS युनिट्स / कार्यक्रम अधिकारी आणि  NSS स्वयंसेवक यांनी स्वैच्छिक समाजसेवेसाठी दिलेल्या विशेष योगदानाला मान्यता देऊन पुरस्कृत करणे हा यामागचा हेतू आहे.