भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सांडू तुकाराम कऱ्हाळे यांचा शासनाच्या वतीने गौरव

औरंगाबाद ,९ऑगस्ट /प्रतिनिधी :- स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तरुणांनी आज त्यांचे विचार आचरणात आणावे असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

May be an image of 9 people and people standing

भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हातील निल्लोड येथील 94 वर्षीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सांडू तुकाराम कऱ्हाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा.गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, निल्लोडचे सरपंच पाचाबाई रेसवाल , उपसरपंच विलास आहेर, जयप्रकाश गोराडे, अक्षय मगर, रावसाहेब गोराडे आदी उपस्थित होते.

May be an image of 8 people, people sitting and people standing

महसूल राज्यमंत्री म्हणाले की, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सांडू कऱ्हाळे बाबा यांचे स्वातंत्र्य लढ्यात आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात मोलाचे योगदान आहे त्यांच्या विचारांचा आपण आदर्श घेणे गरजेचे आहे. आज कऱ्हाळे बाबा यांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळणे  हे आपले भाग्यच आहे असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की , आदरणीय सांडू कऱ्हाळे यांचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान तर आहेच शिवाय निजाम राजवटीच्या विरोधात देखील त्यांनी लढा पुकारलेला आहे. वागरोला लढाई तसेच करोडी लढाई मध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील 5 स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव होत आहे त्यातील एक आपल्या जिल्ह्यातील आदरणीय सांडू कऱ्हाळे यांचा सत्कार होणे हे आपले भाग्य आहे. त्यांच्या विचारांचे आचरण आजच्या तरुणांनी करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

देशासाठी काहीही करण्याची तयारी – स्वातंत्र्य सैनिक सांडू तुकाराम कऱ्हाळे

स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा कोणत्याही लढ्यात एकच ध्येय होतं ते म्हणजे देशासाठी प्राणाची आहुती देणे. प्राण पणाला लावताना कधीही विचार केला नाही असे स्वातंत्र्य सैनिक सांडू तुकाराम कऱ्हाळे सत्कार प्रसंगी म्हणाले.