वैजापूर येथे गांजा पिण्यावरून झालेल्या वादातून मंदिरच्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या ; तिघांना अटक

वैजापूर, १०डिसेंबर / प्रतिनिधी :-मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या एका 55 वर्षीय पुरोहिताचा खून झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता.09) दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात उघडकीस आली. या परिसरातील गवळीबाबा मंदिराच्यामागे त्यांचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

कैलास गणपत चव्हाण (55) रा.बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, अहमदनगर असे या मृत पुरोहिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरानजीकच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात असलेल्या गवळीबाबा मंदिर असून तेथेच असलेल्या एका झोपडीत पुरोहित कैलास चव्हाण वास्तव्यास होते. गेल्या  दीड वर्षांपासून ते या मंदिरात पौरोहित्य करून ते तेथेच राहत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान 9 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास परिसरातील एका शेतकऱ्यास मंदिराच्या पाठिमागील बाजूस पुरोहिताचा मृतदेह दिसल्याने त्याने या घटनेची माहिती तात्काळ वैजापूर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक राम घाडगे, योगेश झाल्टे, विजय भोटकर, प्रशांत गीते आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पुरोहित चव्हाण यांचा मृतदेह गवळीबाबा मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या झाडाझुडुपात पोलिसांना आढळून आला. पाहणीदरम्यान घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, सायकल, चिलीम, गांजाच्या झाडाची पाने व थोड्याच अंतरावर काठीही आढळून आली. याशिवाय याच ठिकाणी असलेल्या एका पिशवीत ‘वशीकरण’ शीर्षक असलेले पुस्तकही पोलिसांना आढळून आले. गुरुवारी मध्यरात्री मंदिर परिसरात आरडाओरड ऐकू येत होती अशी माहितीही परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी पोलिसांना दिली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान या पुरोहिताच्या खूनामुळे वैजापूर पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले होते. पुरोहिताचा खून कुणी, कशासाठी व का केला? या प्रश्नांच्या मुळापर्यंत पोलिसांना जावे लागणार होते.. गुरुवारी रात्री मंदिर परिसरात आरडाओरड सुरू होती. असे काही नागरिकांनी सांगितल्यामुळे घटनास्थळी एकापेक्षा जास्त नागरिक होते. हे सिद्ध होते. याशिवाय घटनास्थळी वशीकरण नावाचे पुस्तक आढळून आल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता शुभम पवार, अजय पगारे व समर्थ मनोरे यांनी खुनाची कबुली दिली. गांजा पिण्यासाठी गेलो असता वाद झाल्याने तेथील काठीने मारहाण करून पुरोहिताला जीवे मारल्याचे त्यांनी सांगितले.