वैजापूर येथे अंगणवाडी-बालवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

वैजापूर,२८ मार्च  /प्रतिनिधी :-आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी – बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी 28 व 29 मार्च 2022 रोजी संप पुकारण्यात आला असून या संपात वैजापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी -बालवाडी सेविकांनी सहभाग नोंदवत सोमवारी शहरातून मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. 

युनियनचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रा.कॉ. राम बाहेती व तालुकाध्यक्ष शालिनी पगारे, शोभा तांदळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युनियनच्या शबाना शेख, पंचशीला धनेश्वर, सोनी चव्हाण,वमीना पवार, शैला बोऱ्हाडे,  संजीवनी पंडागळे, रंजना माळी यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी व बालवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. मुख्यमार्गांने हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, वेतनश्रेणी लागू होत नाही तोपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार मासिक 26 हजार रुपये किमान वेतन द्यावे, पेन्शन लागू करावी, मानधनाची अर्धी रक्कम पेन्शन म्हणून द्यावी, नवीन मोबाईल देण्याची तरतूद अंमलात आणावी,पोषण ट्रेकर अँप मराठीत करण्यात यावे,गेल्या दोन वर्षांपासूनचे थकीत प्रवास भाडेभता देयके तात्काळ द्यावीत. यासह स्थानिक मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.