अधिवेशनात चार मंत्र्यांच्या विरोधात घोटाळ्यांचे पुरावे: पण सरकारने याची दखल घेतली नाही – विरोधी पक्षनेते अजितदादा पवार

नागपूर ,३० डिसेंबर/ प्रतिनिधी :-अधिवेशनात चार मंत्र्यांच्या विरोधात घोटाळ्यांचे पुरावे दिले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण सरकारने याची दखल घेतली नाही. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी अंतिम आठवडा प्रस्तावातून सरकारचे लक्ष वेधले. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी रिप्लाय देताना याला स्पर्श केला नाही. उलट ते म्हणाले की, विरोधी पक्षातील लोकं असे बोलले आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी सांगितले की, आमच्या काळातही चुका झाल्या असतील त्यावरही अॅक्शन घ्या, असे स्पष्टपणे सांगितले, असे अजितदादांनी सांगितले.

यावेळीच्या अधिवेशनात चार-एक विधेयक सत्ताधाऱ्यांनी चर्चा न करताच मंजूर केली, असा आरोप अजितदादांनी राज्य सरकारवर केला. शेतकऱ्यांच्या पीक विमाबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तसेच विदर्भातील सोयाबीन, कापूस, संत्रा या फळ व पिकांबाबत विरोधकांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याला ठोस उत्तर देण्यात आले नाही, असे अजितदादा पवार म्हणाले.

या सरकारकडून आमदारांना पक्ष बघून सुरक्षा दिली जाते. y+ सुरक्षा दिली आहे. आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला २ कोटी ४० लाख होतो. एवढ्या खर्चाची गरज काय? असा सवाल अजितदादांनी उपस्थित केला. गरज असेल त्यांनी सुरक्षा जरूर पुरवावी असे ते म्हणाले. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणाच्या प्रगतीसाठी मार्ग होता. तो ११ वर्षापासून रखडलेला आहे, त्यावर मुख्यमंत्री साधे बोललेही नाहीत, असे अजितदादा पवार यांनी सांगितले.

अजितदादांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत ते विरोधकांना बोलण्याची संधी देत नव्हते. सूरजागड प्रकल्प हा भिलाई स्टील प्लांटपेक्षा मोठा होऊ शकतो. येथे सरकारने दिल्लीच्या आशीर्वादावर येथे उद्योगपती आणला आहे. तो गडचिरोलीची वनसंपदा लुटून घेऊन चाललाय, त्यावर सरकार गप्प आहे, असे अजितदादा म्हणाले.

बेरोजगारी, परराज्यात गेलेले उद्योग, हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव, राजकीय द्वेषातून अधिकाऱ्यांचे निलंबन केले, धर्मा-धर्माच तेढ निर्माण करणारी आंतरधर्मीय समिती रद्द करा, आदी मुद्द्यांवर समाधानकारक उत्तर मिळाला नसल्याचे अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.