प्रत्येक घरात भूजल पुनर्भरण वर चर्चा घडणार…!

भूजल विभागाच्या महिला करतायेत  भूजल पुनर्भरण बद्दल जन जागृती … !

औरंगाबाद ,२१ जुलै /प्रतिनिधी :-भूजल सुरक्षासाठी चार स्तंभ महत्त्वाचे असून ते स्तंभ म्हणजे जलसंवर्धन, पाण्याचा योग्य वापर, पुनर्वापर आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनचर्चा आणि जनआंदोलन आवश्यक आहे.  आपण जशी पैशांची बचत करतो तशीच पाण्याची बचत करणे आवश्यक आहे, हे येणाऱ्या पिढ्यांना शिकवणे काळाची गरज आहे.  भारत हा सर्वात जास्त भूजल उपसा करणारा देश आहे. आपल्या देशात कृषीसाठी सर्वाधिक पाणी खर्च होते. एकूण पाण्यापैकी 89 टक्के पाणी कृषीसाठी वापरले जाते. त्यापैकी 65 टक्के भूजल उपसा असतो. उद्योगांसाठीही भूजलाचे 80 टक्के पाणी वापरले जाते. त्यामुळे या भूजलाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सन – २०२१ हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून  साजरे करत आहे. यंत्रणेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली राज्यभर भूजल साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी औरंगाबाद येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील महिलांनी एकत्र येऊन भूजल पुनर्भरण  बद्दल जन जागृती करत आहे. गावातील घराघरात होऊन महिलेसोबत संवाद साधत आहे. प्रत्येक घरात भूजल पुनर्भरण वर चर्चा घडऊन आणत आहे. आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून केली आहे. स्वतः राहत असलेल्या घरात , बिल्डिंग मध्ये, अपार्टमेंट मध्ये, कॉलनी मध्ये भूजल पुनर्भरण बद्दल माहित दिली जात असून भूजल पुनर्भरण प्रत्येक्षात राबविले जात आहे.

याचाच एक भाग म्हणून विभागीय उपसंचालक भीमराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाच्या स्वप्ना  हिवरे, अंजली कचरे, दीपाली खोबरे, वंदना सुकाळे, अनिता तांदळे, रुपाली शिंदे, स्वाती पापुलवाड यांनी  मौजे लांजी ता. गंगापूर  जिल्हा औरंगाबाद येथील ग्राम पंचायतीस भेट देऊन  भूजल पुनर्भरण बाबत जनचर्चा  घडवून आणली, आणि भूजल पुनर्भरण विषयी माहितीचे पुस्तिका देऊन मार्गदर्शन करण्यात आले.