पाक्सोच्‍या प्रकरणात मुलीला पळविणाऱ्यास तीन वर्षे सक्तमजुरी व दीड हजारांचा दंड

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- सुपारी आणण्यासाठी दुकानात गेलेल्या आठ वर्षीय मुलीला ससा देतो म्हणत पळवून नेणारा आरोपी संजय बेला पवार (रा. गाडेजळगाव, ता. जि. औरंगाबाद) याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १५०० रुपयांच्‍या दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली. विशेष म्हणजे आरोपीवर अशाच प्रकारचा आणखी एक गुन्‍हा दाखल असून तो न्‍यायालयात प्रलंबीत आहे.

या प्रकरणात आठ वर्षीय पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २६ मे २०१८ रोजी फिर्यादीने पीडितेला गावातील दुकानातून सुपारी आणण्‍यासाठी पाठविले होते. त्‍यानूसार पीडिता कच्‍ची सुपारी घेवून आली, मात्र फिर्यादीने कच्ची सुपारी परत करुन भाजलेली सुपारी घेवून ये म्हणत पीडितेला पुन्‍हा दुकानात पाठवले. बराच वेळ झाला तरी पीडिता घरी परतली नाही. त्‍यामुळे फिर्यादीने दुकानदार कडे विचारणा केली असता त्‍याने पीडितेला सुपारी देवून घरी पाठविल्याचे सांगितले. त्‍यानंतर फिर्यादीसह त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी गावात शोध घेतला मात्र ती सापडली नाही.या प्रकरणात करमाड पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गुन्‍ह्याचा तपास सुरु असतांना पोलिस व गावकरी पीडितेचा शोध घेत होते, महादेव मंदीर जिराचा खोरा परिसरात आरोपी हा पीडितेसोबत सापडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तर पीडितेने आरोपीने ससा देतो असे आमिष दाखवून पीडितेला सोबत घेतल्याने जबाबात सांगितले.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात पीडितेसह प्रत्‍यदर्शींची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी संजय पवार याला दोषी ठरवून भादंवी कलम ३६३ आणि पाक्सोच्‍या कलम ८ अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी ५०० रुपये दंड तसेच कलम ३५४ अन्वये एक वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.