भारतात आतापर्यंत एकूण 41.54 कोटीपेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण

कोरोनामुक्तीचा दर वाढून 97.36% पर्यंत पोहोचला
गेल्या 24 तासांत 42,015 नवीन कोरोनारुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.27%) सलग 30 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

नवी दिल्ली ,२१ जुलै /प्रतिनिधी :-भारतात आतापर्यंत एकूण 41.54 कोटीपेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या तात्कालिक अहवालानुसार,कोरोना प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत 51,36,590 सत्रांद्वारे एकूण 41,54,72,455 मात्रा, देण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत लसींच्या 34,25,446 मात्रा देण्यात आल्या.

दि. 21 जून 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभर लसीकरणाचा वेग व व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

या महामारीच्या आरंभापासून विचार करता, बाधित रुग्णांपैकी 3,03,90,687 व्यक्ती आतापर्यंत कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या चोवीस तासांत 36,977 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत असून आता तो 97.36% पर्यंत पोहोचला आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 42,015 नवीन कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या सलग चोवीस दिवसांपासून, दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 50,000 पेक्षा कमी आहे. केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी समन्वयाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच हे फलित आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या आज 4,07,170 इतकी असून, सध्या तिचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 1.30% इतके आहे.

कोविड चाचण्या करण्याच्या क्षमतेत देशभरात लक्षणीय वाढ झाल्याने गेल्या चोवीस तासांत देशात एकूण 18,52,140 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण 44.91 कोटीपेक्षा अधिक (44,91,93,273) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

एकीकडे देशातील चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात यश आले असून त्याचवेळी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी म्हणजे कोरोना झाल्याचे निदान होण्याचा दर सध्या 2.09% इतका आहे, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.27% इतका आहे. गेल्या सलग तीस दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3% पेक्षा कमी आहे, तर तो 5% पेक्षा कमी असण्याचा हा सलग चव्वेचाळिसावा दिवस आहे.