औरंगाबाद जिल्ह्यांत पाच वर्षांत ८४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

Over 800 Farmers Committed Suicide in Maharashtra This Year, Says Report |  NewsClick

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण अहवाल तात्काळ सादर करा – निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर

औरंगाबाद ,२० मे / प्रतिनिधी :-

‘उभारी 2.0’ या उपक्रमातंर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या भविष्यातील नियोजनासाठी जिल्ह्यातील सन 2015 ते 2020 या कालावधीतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सर्वेक्षण करुन परिपूर्ण अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश आज निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी संबंधित सर्व तहसिलदार व नायब तहसिदार यांना दिले. 

            जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या दालनात जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हीसी) श्री.जाधवर यांनी संवाद साधला. यावेळी नायब तहसिलदार वैशाली डोंगरजाळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत श्री.जाधवर आणि संबंधित अधिकारी यांनी सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणी जाणून करावयाच्या उपाय योजनांबाबत चर्चा केली. 

यावेळी श्री जाधवर म्हणाले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘उभारी 2.0’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकरी आत्महत्या व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाबत संवेदनशील राहून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पूर्णपणे सामाजिक,आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापूर्वी झालेल्या प्रयत्नातून अनेक कुटुंबांना आभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले परंतु पूर्णपणे शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळे या सामाजिक समस्याबाबत जागरूक व सातत्याने काम करत राहण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या ‘उभारी 2.0 ‘ या संकल्पनेतील उपक्रमाद्वारे आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्वेक्षण करणे व त्याआधारे त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिल्यास त्या कुटुंबांना जगण्याची निश्चितच उभारी मिळेल.

तसेच यावेळी श्री.जाधवर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय मागील पाच वर्षातील म्हणजेच सन-2015 ते 2020 या कालावधीतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा आढावा घेतला. त्यात औरंगाबाद  – 76, फुलंब्री – 100, पैठण – 155, सिल्लोड – 154, सोयगाव – 64, कन्नड – 113, खुलताबाद – 42, वैजापूर – 68, गंगापूर – 67, अपर तहसील कार्यालय औरंगाबाद – 01 असे एकूण – 840 आत्महत्याग्रस्त शेतकरी असून तहसिल कार्यालयात जमा झालेली सर्व विवरणपत्रातील माहिती संकेतस्थळावर ऑनलाईन भरल्यानंतर या माहितीचे विश्लेषण करुन मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासनाच्या विविध विभागांच्या कोणत्या योजनांचा लाभ देता येईल याची निश्चिती करावी व कुटुंबनिहाय तपशील या कार्यालयास सादर करावा. हा परिपूर्ण सर्वेक्षण अहवाल जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लवकरच सादर करण्यात येतील. त्यामुळे या कुटुंबियांना लवकरात लवकर विविध योजनांचा लाभ देता येईल. त्यामुळे ‘उभारी 2.0’ या उपक्रमाचे उद्दीष्टही साध्य करणे शक्य होईल. 

“शेतकरी आत्महत्या”  हा अतिशय संवेदनशील विषय आहे. राज्य शासनाने दिलेल्या निकषांच्या आधारे मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियास 1 लाख रुपये सानुग्रह अनुदान शासनामार्फत देण्यात येते. शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास कधीही भरुन न येणारे नुकसान होते. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो. या कुटुंबांच्या गरजा आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद द्वारे “उभारी 2.0”  हा  उपक्रम  सुरू करण्यात आला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास भेट देवून त्यांच्या सामजिक व आर्थिक स्थिती विषयी माहिती संकलित करणे, विविध शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करणे आणि  भविष्यातील नियोजनामध्ये काही नवीन उपाययोजनांचा समावेश करणे ही या उपक्रमांची प्रमुख उद्दिटे आहेत. “उभारी 2.0” चा वार्षिक आढावा घेवून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनास प्रस्ताव सादर करुन कार्यात्मक शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.