शरजील उस्मानीचं धार्मिक भावना दुखावणारं ट्विट; जालन्यात गुन्हा

जालना ,२० मे / प्रतिनिधी :- अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता  याच्या विरुद्ध धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी अंबड जि.जालना पो​लि​स ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करणे हिंदू देव देवताची बदनामी करणारा मजकूर सोशल मीडियावर पसरवणे प्रसिद्ध करणे असा शर्जील यांच्यावर आरोप आहे.अंबड पोलिस ठाण्यात हिंदू जागरण मंचचे जिल्हा संयोजक अंबदास अंभोरे यांच्या तक्रारी वरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबड पोलिसांनी उस्मानीविरोधात बुधवारी रात्री भारतीय दंड संहिता कलम २९५-अ (धार्मिक भावनांना भडकावणारे द्वेषपूर्ण कृत्य) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण जालना सायबर सेलकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

३० जानेवारी रोजी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या वेळी केलेल्या भाषणावरून उस्मानीविरोधात १५३- अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करता उस्मानीचा जबाब नोंदवून घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच उस्मानी याला स्वारगेट पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मार्च महिन्यात स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये त्याचा जबाब नोंदवण्यात आला होता.