७५ हजार रुपये किंमतीचे रॉक ब्रेकर लोखंडी चिजलसह दुचाकी चोरुन नेणाऱ्यास अटक

औरंगाबाद ,२१ मे /प्रतिनिधी :-हायड्रोलिक्स स्पेअर पार्टच्या होलसेल दुकानातून ७५ हजार रुपये किंमतीचे रॉक ब्रेकर लोखंडी चिजलसह दुचाकी चोरुन नेणाऱ्या दुकानातील अकाउटंटसह त्‍याच्‍या साथीदाराला सातारा पोलिसांनी अटक केली. त्‍यांच्‍याकडून चोरीला गेलेल्या ऐवजापैकी दुचाकी आणि चार लोखंडी चिजल असा सुमारे एक लाखांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला आहे.

आकाश शिवाजी लबडे (२३, रा. संगमनेर जि. अहमदनगर) आणि मोहम्मद इर्शाद मोहम्मद उमर शेख (४९, रा. सादातनगर, सातारा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना २३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.एच. खेडकर यांनी शनिवारी दि.२१ दिले.

या प्रकरणात योगेश सितार लबडे (२९, रा. संगमनेर जि. अहमदनगर ह.मु. सिडको महानगर एमआयडीसी वाळुज) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, बीड बायपास रोडवरील एमआयटी कॉलेजच्‍या सिग्नल शेजारी फिर्यादीचे माऊली हायड्रोलीक्स स्‍पेअर पार्टचे होलसेलचे दुकान आहे. दुकानात आरोपी आकाश लबडे हा अकाउटंट म्हणुन काम करित होता. ३१ मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्‍या सुमारास फिर्यादी हे पो‍कलेन आणि जेसीबीच्‍या कामासाठी चिपळुन येथे गेले होते. त्‍यामुळे दुकानातील कामकाजाची जबाबदारी आरोपी आकाश लबडे याच्‍याकडे होती. आरोपीने संधी फायदा घेत दुकानातील ७५ हजार रुपये किंमतीचे रॉक ब्रकरसह लोखंडी चिजल आणि दुकानातील दुचाकी (क्रं. एमएच-२१-आर-३२६६) असा सुमारे दोन लाख पाच हजारांचा ऐवज चोरुन नेली. ९ एप्रिल रोजी फिर्यादी घरी आले असता ही बाब त्‍यांच्‍या निदर्शनास आली. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी आरोपीला विमाननगर (जि. पुणे) येथून अटक करित त्‍याने चोरलेली दुचाकी जप्‍त केली. चौकशी दरम्यान त्‍याने चोरलेला ऐवज हा बीड बायपास रोडवरील भंगार विक्रेता मोहम्मद इर्शाद याला विक्री केल्याचे सांगितले. त्‍यानूसार पोलिसांनी इर्शादला अटक केली. दोघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍याता आले असता सहायक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी आरोपींकडून उर्वरित ऐवज हस्‍तगत करायचा आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.