शेतकरी अडचणीत पण मुख्यमंत्री सत्कार सोहळ्यात व्यस्त-अजित पवारांचा हल्लाबोल

अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यास मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य द्यावे

मुंबई ,२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि पुराने शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री ठिकठिकाणी सत्कार स्वीकारण्यात व्यस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. पूरग्रस्त भागात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना लोकांच्या समस्येबाबत पत्र देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन आता एक महिना पूर्ण होत आला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. १८ जुलै रोजी ठरलेले पावसाळी अधिवेशन अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी अडचणी मांडायच्या तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नुकताच अजितदादांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्याच्या आधारावर आपल्या मागण्यांचे निवेदन तयार असून ते लवकरच मुख्यमंत्र्यांना देऊ, असे अजितदादांनी स्पष्ट केले.

May be an image of 6 people, people standing and indoor

अजितदादा म्हणाले की, राज्यातील विविध भागात जवळपास १० लाख हेक्टर शेतजमिनीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. अनेकांचा मृत्यू झाला असून त्यांना फक्त चार लाखांची मदत दिली गेली आहे. त्यात वाढ करण्यात यावी व पशूधन गमावले त्यासाठीही मदत देण्यात यावी. खरीपाच्या पिकांना हेक्टरी ७५ हजार आणि फळबागांना हेक्टरी दीड लाखांची मदत करावी. गाळ वाहून गेलेल्या शेतजमिनी पूर्ववत करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशा २१ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे अजितदादांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील परिस्थिती हलाखीची असून सर्वसामान्य माणसाला आज उभे करण्याची गरज आहे. अशावेळी सरकारची सर्व खाती पूर्ण क्षमतेने कार्यरत असायला हवीत. मात्र दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनाच सर्व खात्यांचा कारभार पाहावा लागतोय. प्रशासनाकडून माहिती घेतली असता अद्याप उपमुख्यमंत्र्यांदेखील कोणत्याही खात्याची जबाबदारी दिलेली नाही. साधारण ४२ मंत्री हे मंत्रिमंडळात असतात, तरीही मुख्यमंत्र्यांना ताण असतो. इथे तर एकटेच मुख्यमंत्री सर्व खात्यांना न्याय कसा देणार? असा प्रश्न मा. अजितदादांनी उपस्थित केला. आज मंत्रालयात अनेक महत्त्वाच्या फाईल्स मंजुरीविना तुंबून पडल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना अजितदादा म्हणाले की, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, अशी चर्चा काही आमदारांमध्ये आहे. त्याआधीच मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यासाठी जात आहेत तिथे नियम पायदळी तुडवून त्यांची मिरवणूक काढली जात आहे. सत्कार समारंभ केले जात आहेत. रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावता कामा नयेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे असते. जर त्यांच्याच समारंभात नियम मोडले जात असतील तर पोलीस प्रशासनाने काय करायचं? मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यांमध्ये सत्कार समारंभांना कमी प्राधान्य देऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, अशी अपेक्षा अजितदादांनी व्यक्त केली.

May be an image of 15 people, people standing and outdoors

आत्महत्याग्रस्त त्या शेतकऱ्याला तात्काळ मदत द्या

अजितदादा पवार हे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली. श्री. विजय पुजाराम शेळके (वय ४२) या शेतकऱ्याने अतिवृष्टी व पूरसंकटामुळे आत्महत्या केली, असा अंदाज आहे. या शेतकऱ्याच्या पिकाचे आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याच्या पश्चात आता कुटुंबाला आधार देण्यासाठी सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

May be an image of 3 people, tree and outdoors

देशातील महागाईबाबत गृहिणींना विचारावे

भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. याबाबत राज्यसरकार काय पावले उचलणार आहे हे सांगायला तयार नाही. निर्मला सीतारामन या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे वक्तव्य ऐकले, मात्र सर्वसामान्य गृहिणीला विचारले तर किती महागाई वाढली आहे हे लक्षात येईल. तेलाच्या किमती कमी आहेत हे मान्य करायला हवे. परंतु इतर वस्तूंच्या किमती कमी झालेल्या नाहीत. २०१६ मध्ये नोटबंदी झाली त्यावेळी कॅशलेसचा आभास निर्माण केला गेला व काळा पैसा बाहेर येईल असे सांगण्यात आले. परंतु तसे झाले नाही. अद्याप आरबीआयने किती नकली नोटा मिळाल्या हे सांगितलेले नाही. दोन हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या आहेत अशी चर्चा आहे. ते शोधण्याचे काम करावे, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजितदादा म्हणाले.

या पत्रकार परिषदेस पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांबाबतचे निवेदन राज्यपालांना सादर केले. यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, आ. अनिल पाटील, आ. नितीन पवार, आ.चंद्रकांत नवघरे, आ. सुनील भुसारा आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

निवेदनात खालील मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

• शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेले संकट लक्षात घेऊन विदर्भ, मराठवाडा व पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करावा.

• अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी रु. 75 हजार मदत द्यावी, तसेच फळ पिकांसाठी हेक्टरी रु.1 लाख 50 हजार तात्काळ मदत करावी.

• अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरता सरसकट शैक्षणिक शुल्क माफ करावे.

• विदर्भ व मराठवाड्यामध्ये शेतमजुरांची संख्या मोठी असून मागील 15 ते 20 दिवसांपासून शेतमजुरांवर मजुरीअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शेतमजुरांना सुद्धा एकरकमी मदत करण्याबाबतची सकारात्मक भूमिका सरकारने घ्यावी.

• आदिवासी क्षेत्रामध्ये मुख्यत्वे भाताची लागवड असते. आदिवासी बांधवांना या कालावधीत उपजिवीकेचे साधन नसल्याने महाविकास आघाडीच्या शासनाने खावटीचे अनुदान दिले होते. त्याच धर्तीवर यावर्षीही खावटीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे.