रेमडेसिवीरचा काळाबाजार,आणखी एक महत्वाचा आरोपी जेरबंद    

औरंगाबाद,६ मे  / प्रतिनिधी 

पॅथॉलॉजी लॅब चालकासह दोघांना मंगळवारी गुन्हे शाखेने रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना अटक केली होती. त्याचा तपास करणा-या पुंडलिकनगर पोलिसांनी त्यातील महत्वाची कडी असलेल्या माधव अशोक शेळके (३०, रा. तोडगाव, भोकरदन, जालना) याला बुधवारी दि.५ सकाळी अटक केली. आरोपी माधव शेळके याला १० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी गुरुवारी दि.६ दिले.

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवण्यासाठी राज्य सरकारने त्याचे संपूर्ण अधिकारी, नियंत्रण स्थानिक जिल्हाधिका-यांकडे दिले आहेत. मात्र, या प्रक्रियेनंतर देखील राज्यभर सर्रास रेमडे सिवीरचा काळाबाजार सर्रास सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. पुंडलिकनगर पोलिस व गुन्हे शाखेने आत्तापर्यंत काळाबाजार करणा-या तीन टोळ्यांना अटक केली आहे. मंगळवारी गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने साता-यातील पॅथॉलॉजी लॅब चालक संदीप चवळी व गोपाल गांगवे या दोघांना सापळा रचून अटक केली होती. त्यांच्याकडून केवळ राज्य सरकारच्या वापरासाठी असा विशेष उल्लेख असलेल्या तीन इंजेक्शनसह दोन कंपन्यांचे पावडर स्वरुपातील एकून सहा रेमडेसिवीर जप्त करण्यात आले. चौकशीमध्ये आरोपी संदीप चवळी याने माधव शेळके याच्‍याकडून प्रत्‍येकी आठ हजार रुपये प्रमाणे सहा इंजेक्शन विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी पहाटेच परभणीला रवाना झाले होते. मात्र, तोपर्यंत शेळके मोबाइल बंद करुन फरार झाला होता. विशेष म्हणजे आरोपी शेळकेची पत्नी परभणीच्या सरकारी रुग्णालयात नर्स असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान शेळके हा गुन्‍ह्यात अटकपूर्व जामीनीसाठी कोर्टात येणार असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली; त्‍यानूसार पोलिसांनी सापळा रचून धुळे हायवे रोडवरील सातारा परिसरातील डोंगरात अटक केली. शेळकेची चौकशी केली असता त्‍याने, सदरील इजेक्शन परभणी येथून आणले व चवळीला जालन्‍यातील अंबड चौफुलीवर आणुन दिल्याचे सांगितले.

आरोपी शेळकेला १० मेपर्यंत पोलीस कोठडी

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील नितीन जाधव यांनी आरोपी शेळकेने सदरील इजेक्शन कोठून व कोणाकडून घेतले याचा तपास करणे आहे. सदरील इजेक्शन हे शासकीय रुग्णालयातील असावेत असा संशय असल्‍याने त्‍या दृष्‍टीने तपास करणे आहे. आरोपीची पत्‍नी परभणी येथील सरकारी रुग्णालयात नर्स असल्याने गुन्‍ह्यात तीचा सहभाग आहे का याचा देखील तपास बाकी आहे. शेळके याने चवळीला यापूर्वी किती इजेक्शन दिले आहेत याचा तपासा करणे आहे. शळके याने गोपाल गांगवे याच्‍याकडून फोन पे व्‍दारे ४० हजार रुपये देवून इंजेक्शन विकत घेतले आहे. ते पैसे शळकेने कोणाला दिले व कोणाकडून इजेक्श विकत घेतले याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.