महावितरणच्या २ लाखांवर ग्राहकांचा वीजमीटर रीडिंग पाठवण्यास प्रतिसाद

औरंगाबाद,६ मे  / प्रतिनिधी : 

स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठवण्यास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी मोबाईल  अ‍ॅप, वेबसाईट व ‘एसएमएस’द्वारे मीटरचे रीडिंग महावितरणकडे पाठवले आहे. यामध्ये औरंगाबाद परिमंडलातील १० हजार वीजग्राहकांचा समावेश आहे.
    ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठवण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रीडिंग पाठवण्याची मुदतही चार दिवस करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेही मीटर रीडिंग पाठवण्याची खास सोय उपलब्ध आहे. याआधी मागील मार्च महिन्यात १ लाख ३५ हजार २६१ ग्राहकांनी मीटर रिडींग पाठवले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिल महिन्यात ६७ हजार ४८१ संख्येने वाढ झाली आहे.
    प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रीडिंगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवस आधी रीडिंग पाठवण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अ‍ॅप, www.mahadiscom.in किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्ल्यूएच (kWh) रीडिंग पाठवता येते. गेल्या एप्रिल महिन्यात राज्यातील २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठवलेले आहे. यात पुणे परिमंडलातील ४९९५०, कल्याण- २८९१६, नाशिक- २२३३०, भांडूप- १८०९३, बारामती- १३७३३, जळगाव- १०८७७, औरंगाबाद- १०१००, कोल्हापूर- ८४७०, नागपूर- ७२६९, अकोला- ७१८०, लातूर- ६०८५, अमरावती- ५६६२, कोकण- ४२२३, गोंदिया- ३४६४, नांदेड- ३२६२ व चंद्रपूर परिमंडलातील ३१३८ वीजग्राहकांचा समावेश आहे.
    महावितरण मोबाईल  अ‍ॅपमध्ये ‘सबमीट मीटर रीडिंग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्ल्यूएच (kWh) रीडिंगचा (केडब्ल्यू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमीट करावे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉग-इन करून www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करता येईल. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवण्यासाठी MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रिडींग 8 अंकापर्यंत> असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठवल्यास मीटर रीडिंग सबमीट करता येईल.
    वीजग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठवल्यास मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीज वापरावरही नियंत्रण राहील. रीडिंगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. रीडिंग पाठवण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. यासह विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी दरमहा मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.