कोरोनाला हरवण्यासाठी नियमबध्द जीवनशैली स्विकारावी -सुनील चव्हाण

‘मन में है विश्वास’ उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात

औरंगाबाद, दि.१३ :-जिल्हयाला कोरोनामुक्त करण्याचे उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी धीराने,धैर्याने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहीजे. या लढाईत आपण सगळे सोबत आहोत. ‘ मन में है  विश्वास’  या सकारात्मक  जाणिवेतून  सर्वांनी कोरोनाला हरवण्यासाठी नियमबध्द  जीवनशैली स्विकारावी , असेआवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

      कोविड- 19 या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संकट काळात नागरिकांच्या  मनोधैर्याला प्रोत्साहन  देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेला  “मन में है विश्वास…. ” हा  नाविन्यपूर्ण उपक्रम मंगळवारी 13 ऑक्टोबर रोजी  सकाळी 09  वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक नरेश गीते, सैन्यदलाचे  मेजर अभिनंदन, सुभेदार मेजर अजित सिंग, अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. नेमाडे, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, आप्पासाहेब शिंदे, संगीता सानप, मंदार वैद्य, उपायुक्त रवींद्र निकम, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले, संगीता चव्हाण,  तहसिलदार शीतल राजपूत, नायब तहसिलदार सिद्धार्थ धनजकर, श्री. देशमुख यांच्यासह  इतर अधिकारी ,कर्मचारी , नागरिक यांच्यासह सर्व संबंधित त्या्चसोबत समाजातील प्रत्येक घटकातील प्रतिनिधी उपस्थित होते.
         यावेळी  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  समाजात कोरोना विषयीची भीती दूर करुन कोरोनातून लवकर बरे होण्यासाठीचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी ‘ मन मे है विश्वास ’  या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री यांनी कोवीड विरूद्धची लढाई लोकचळवळ बनावी या  साठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपयुक्त  मोहीमेची सुरुवात केली असून औरंगाबाद जिल्हयात त्याची यशस्वी अमंलबजावणी होत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

    तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण नव्वद टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. त्याचसोबत मृत्युदर कमी करण्यात  ही प्रशासनाला यश येत आहे.सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य होत आहे. पण आपली जबाबदारी अजून संपलेली नाही तर याचं पद्धतीने आपल्याला पुढे ही खबरदारी घ्यावी लागेल, असे सांगून श्री.चव्हाण म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात ही अनेक जण बाधीत झाले होते,  पण  योग्य उपचार घेऊन ते आता  पुन्हा कामावर रुजू ही झाले आहेत.जिल्हयातील सर्व कोरोनामुक्त पुन्हा आधीसारखे दैनंदिन आयुष्य जगत आहेत. कोरोनावर वेळीच योग्य उपचार घेतला आणि योग्य खबरदारी घेतली तर निश्चितच या संसर्गापासून बचाव करणे शक्य आहे. आपली संतांची भूमी आहे. त्यामुळे या आरोग्य संकटाच्या काळात नियमांचे पालन करत   धीराने, धैर्याने आपल्याला हा लढा यशस्वी करायचा आहे. ‘मन में है विश्वास’ ठेवून आपण खंबीरपणे उभे राहणार आहोत. प्रशासन नागरिकांच्यासोबत असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून  आपण कोरोनाला हरवू आणि जिल्हा कोरानामुक्त करु, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

        या कार्यक्रमात विविध धर्माचे धर्मगुरू,  कलाकार, नर्सेस,  पोलीस, आरोग्य यंत्रणा, कर्मचारी , आशा वर्कर्स, वकील, उद्योजक, पत्रकार, व्यावसायिक , दुकानदार, शेतकरी, भाजीविक्रेते, खेळाडू, ग्रामसेवक, एन. जी. ओ. होमगार्ड, सफाई कर्मचारी, अधिकारी, या सर्व घटकातील व्यक्तीं प्रातिनिधीक स्वरुपात  यावेळी उपस्थित होत्या.

         यावेळी पोलीस बॅंड आणि आर्मी बॅंड यांनी सांगितीक वातावरण निर्माण करत मन में है विश्वास या  गाण्यासह  विविध देशभक्तीची  गीते सादर करत उत्साह आणि देशभक्तीमय वातावरण निर्माण केले.यावेळी तिरंगी रंगाचे फुगे आकाशात मान्यवरांच्या हस्ते सोडण्यात आले. देवगीरी महाविद्यालय संगीत विभागातर्फे प्रा.शैलैजा कुलकर्णी यांच्या विद्यार्थी वृंदाने  हम होंगे कामयाब गीत सादर केले. या गीताला सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून साथ देत कोरोनाला हरवण्याची लढाई यशस्वी होण्यासाठी आपण सज्ज असल्याचा प्रतिसाद दिला.